गडचिराेली : आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक, साहित्यिक, वक्ते तथा देसाईगंजचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी डाॅ. पीतांबर सुदाम काेडापे (४८,गडचिराेली) यांचे शुक्रवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. डाॅ. पीतांबर काेडापे हे कुरखेडा पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत हाेते. तर त्यांच्याकडे देसाईगंज येथील गटसाधन केंद्रात गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार हाेता. शिक्षण क्षेत्रात कर्तव्य पार पाडतच असतानाच ते आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करीत हाेते. विद्यापीठे व साहित्य अकादमी यांच्याद्वारा आयाेजित साहित्य संमेलन, कविसंमेलन, परिसंवाद, चर्चासत्र आदी वैचारिक कार्यक्रमांमध्ये त्यांना यापूर्वी बाेलावून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा ‘उरस्कल’ हा कवितासंग्रह व ‘रानझुलवा’ हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित आहे. ‘तुडबुडी’ हा कथासंग्रह व ‘आदिवासी कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा’ हा समीक्षाग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते मूळचे चामाेर्शी तालुक्याच्या फाेकुर्डी गावचे रहिवासी हाेत. त्यांच्या पश्चात पत्नी(शिक्षिका), दाेन मुली, भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गडचिराेली येथील कठाणी नदीघाटावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच साहित्य क्षेत्रातील लेखक, कवी उपस्थित हाेते.
गटशिक्षणाधिकारी काेडापे यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:35 AM