मुख्याध्यापकांना कार्यालयीन कामे डोईजड
By admin | Published: July 18, 2015 01:37 AM2015-07-18T01:37:56+5:302015-07-18T01:37:56+5:30
बालकांचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार बालके प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता गावापासून एक किमीअंतरावर शाळा, अशी तरतूद करण्यात आली.
एक व द्विशिक्षकी शाळा : दैनंदिन नोंदी, रेकॉर्ड, माहितीपत्रक, शैक्षणिक साहित्याचा हिशेब ठेवण्यात जातो वेळ
गडचिरोली : बालकांचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार बालके प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता गावापासून एक किमीअंतरावर शाळा, अशी तरतूद करण्यात आली. यानुसार खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली. जिल्ह्यात शिक्षणाच्या सोयीकरिता एक शिक्षकी व द्विशिक्षकी शाळांची निर्मिती करण्यात आली. परंतु या शाळांमध्ये मुख्याध्यापकांनाच कार्यालयीन कामासाठी शैक्षणिक व अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अनेक मुख्याध्यापकांना ते डोईजड झाले आहे.
शासनाच्या धोरणान्वये शाळा व परिसर स्वच्छ ठेवणे, पिण्याचे शुद्ध पाणी ठेवणे, बगिचा लावणे, शालेय पोषण आहार शिजविणे व तो विद्यार्थ्यांना वाढणे, भाजीपाला असणे, भोजन स्वादिष्ट ठेवणे, साठा सुरक्षित ठेवणे, वर्ग अध्यापन यासह इतर दैनंदिन नोंदी मुख्याध्यापकांना ठेवाव्यात लागतात. बहुशिक्षकी शाळेच्या मुख्याध्यापकाप्रमाणेच त्यांना सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे एक व द्विशिक्षकी शाळांतील मुख्याध्यापकांना सदर कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापक बालकांनाही साफसफाई व घंटा वाजविण्याचे काम सांगू शकत नाही. मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्याची उचल करणे, शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव, मागणीपत्र कार्यालयात नेणे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना हजर करणे यासह विविध कामे करावी लागतात. (शहर प्रतिनिधी)