एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्याचा दुर्गम भाग म्हणजे समस्याग्रस्त परिसर. पावसाळ्यात आराेग्यसेवेत तर संकटांची भरमार असते. असाच संकटाचा प्रसंग २६ जुलै राेजी प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा अंतर्गत नदीपलीकडील कुदरी गावात घडला. प्रसूतीनंतर उपचार आवश्यक असलेल्या माता-बालकावर उपचार करण्यासाठी ताेडसा प्राथमिक आराेग्य केंद्राची चमू चक्क भरलेल्या नदीतून डाेंग्याने प्रवास करून व पायी ४ कि.मी. अंतरावरील चिखल तुडवून कुदरी गावात पाेहाेचली व मातेवर उपचार तर बालकावर आवश्यक लसीकरण २४ तासांच्या आत केले.
एटापल्ली तालुक्याच्या मोहुर्ली गावातील ३२ वर्षीय गरोदर माता चमरी महारू गावडे हिला पोटात दुखत हाेते. तिच्या पतीने मवेली उपकेंद्रातील आरोग्य सेविका दुर्वा यांना फोनवरून याबाबत कळविले व कुदरी नदीच्या घाटावर येऊन राहण्यास सांगितले. आरोग्य सेविका व चमू रुग्णवाहिका घेऊन नदीच्या काठावर पाेहाेचली. परंतु तब्बल २ तास वाट पाहूनही गरोदर महिला पोहाेचली नाही. नंतर फोन करून यायला जमणार नाही, दुसऱ्या दिवशी कुदरीला येऊ, असे माेबाईलद्वारे कळविले.
ही माहिती आराेग्य सेविकेने तोडसाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. राकेश नागोसे यांना कळविले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सेविका, सीएचओ, आरोग्य सेवक आदी कर्मचारी नदीघाटावर पाेहाेचले. तेथून तब्बल ४ किमीचा पायी प्रवास करून कुदरी गाव गाठले.
घरीच प्रसुती, भरती होण्यास नकार
गावात गरोदर मातेची भेट घेण्याकरिता पुजाऱ्याच्या घरी गेले असता मातेची प्रसूती पहाटे ३ वाजता घरीच झाल्याचे सांगितले. बाळाची व आईची तपासणी केली असता बाळाचे वजन ३ किलो हाेते; परंतु मातेची आरोग्य तपासणी केली असता रक्ताचे प्रमाण अतिशय कमी ४.५ ग्रॅम आढळले. तेव्हा मातेला संस्थेत भरती करून रक्त देण्याची गरज आहे, असे सांगून माता व तिच्या पतीला सोबत यायला सांगितले परंतु दोघांनीही येण्यास नकार दिला. ३-४ तास आरोग्य चमू त्यांच्या घरी थांबून प्राथमिक औषधोपचार केला.