पाचव्या दिवशीही धुवाधार... घरे, दुकानात पाणी; सर्वत्र दाणादाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:16 AM2023-07-22T11:16:39+5:302023-07-22T11:19:20+5:30
ढगांचा गडगडाट : आज रेड अलर्टचा इशारा; २३ रस्ते जलमय; दळणवळण ठप्प
गडचिरोली : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. धुवाधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दरम्यान, जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. तब्बल २३ रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावे संपर्काबाहेर गेली असून, दळणवळण ठप्प झाले आहे. शनिवारी (दि. २२) रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
आज पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद
पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहेत. या पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे २० जुलै रोजीच शाळा, अंगणवाड्या व महाविद्यालये बंद ठेवली होती.
पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामूलगौतम, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर परिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मीणा यांनी २२ जुलै रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
भामरागडमध्ये पुन्हा अनेक गावांना पाण्याचा वेढा
भामरागड तालुक्यात २० जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यावर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे २१ जुलैला अनेक गावांचा संपर्क तुटला. सलग चार दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. पर्लकोटा नदीचे पाणी ओसरल्यानंतर २० जुलै रोजी वाहतूक पूर्ववत सुरु झाली. मात्र, विजेअभावी पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल झाले. रात्री पावणेआठ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला, पण नेटवर्क अद्यापही गायब आहे. त्यामुळे संपर्क होण्यास मोठ्या अडचणी येत आहेत.
रात्री वीजपुरवठा सुरू झाला. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच भटकंती करावी लागली. कुडकेली, पेरमिली, चंद्रगाव जवळील नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड ते आलापल्ली वाहतूक ठप्प झाली. भामरागड, लाहेरी, बिनागुंडा, कुवाकोडी (गुंडेनूर नाला), नेलगुंडा परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
हे रस्ते गेले पाण्याखाली
सिडकोंडा -झिंगानूर, कोत्तापल्ली र. - पोचमपल्ली, आसरली- मुतापूर- सोमनूर मौ शीखांब - अमिर्झा, साखरा - चुरचुरा, कुंभी - चांदाळा, रानमूल - माडेमूल, आलापल्ली- सिरोंचा, कान्होली - बोरी-गणपूर, चामोर्शी- कळमगाव, चांभार्डा- अमिर्झा, हरणघाट-चामोर्शी, तळोधी-आमगाव-एटापल्ली, कोनसरी-जामगिरी, आलापल्ली -भामरागड, चामोर्शी-आष्टी, कोपरअल्ली- मुलचेरा, अहेरी- मोयाबिनपेठा-वटरा, चामोर्शी - हरणघाट, कोनसरी जामगिरी, सावेला - कोसमघाट- रायपूर, राजोली -मारदा, पोटेगाव ते राजोली हे रस्ते २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाण्याखाली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आहे.
दुर्गम भागात नेटवर्क गायब
जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती असून, यापैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये अजूनपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये विविध दाखल्यांसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी ग्रा.पं.चेही कामकाज प्रभावित होत आहे.
एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून शासकीय योजना पोहोचवण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत केले जाते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम 'भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे..
सध्या शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र, ग्रा.पं. कडून देण्यात येणारे ऑनलाइन दाखले इंटरनेट अभावी मिळण्यास अडचण होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने 'लक्ष देऊन ग्रामीण व दुर्गम भागातील ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.