तापाच्या साथीमुळे रूग्णालये फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:31 AM2019-09-17T00:31:55+5:302019-09-17T00:32:30+5:30
जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे.
सततचा पावसामुळे वातावरणात बदल होऊन मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. नागरिकांना ताप, सर्दी, अंग दुखणे, खोकला आदींचा त्रास वाढला आहे. जिल्हा रूग्णालयातील प्रत्येक वार्डात क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण भरती आहेत. जिल्हा रूग्णालयाची क्षमता २८६ बेडची आहे. मात्र प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच बाह्यरूग्ण विभागातही चिठ्ठी काढणे, औषधी वितरण विभागात रूग्णांची लांबच लांब रांग लागली असल्याचे दिसून येते. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली गर्दी दुपारी १ वाजेपर्यंत राहते. दुपारी ४ वाजता पुन्हा बाह्यरूग्ण विभाग उघडला जातो. त्यावेळी सुध्दा रूग्णांची गर्दी होत आहे. दरदिवशी ७०० ते १००० रूग्णांची नोंद होत आहे. रूग्ण व त्यांचे नातेवाईक यामुळे रूग्णालयाचा परिसर फुलून गेला आहे.
कर्मचाऱ्यांवर वाढला कामाचा ताण
१०० खाटांचे स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधल्यापासून जिल्हा रूग्णालयावरील भार कमी झाला आहे. या रूग्णालयात सुध्दा बालकांची गर्दी दिसून येत आहे. १०० खाटांचे रूग्णालय असलेल्या या रूग्णालयात जवळपास दीडशे रूग्ण व गरोदर माता भरती आहेत. या रूग्णालयात तुलनेने मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे.