बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच केंद्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:12 AM2018-02-17T01:12:16+5:302018-02-17T01:12:29+5:30

For the HSC examination, five centers are sensitive in the district | बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच केंद्र संवेदनशील

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच केंद्र संवेदनशील

Next
ठळक मुद्देदहावीकरिता तीन केंद्र संवेदनशील : बारावीच्या १६ हजार ७११ विद्यार्थ्यांची २१ पासून कसोटी

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४६ परीक्षा केंद्रांवरून जिल्हाभरात १४ हजार ३५४ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेसाठी संवेदनशील भागात एकूण पाच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना परीक्षेबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
इयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), डायटचे प्राचार्य यांचे एक व महिलांच्या एक स्वतंत्र पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या परीक्षेसाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
यावर्षी परीक्षा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून पाच नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या नव्या परीक्षा केंद्रांमध्ये भगवंतराव ज्युनिअर कॉलेज सिरोंचा, किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड, देशबंधू चित्तरंजनदास येनापूर, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय पोटेगाव व भगवंतराव ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा आदी केंद्रांचा समावेश आहे.
इयत्ता बारावीसाठी संवेदनशील भागात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय आश्रमशाळा जारावंडी, श्री साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा, धनंजय स्मृती कनिष्ठ महाविद्यालय अंगारा, भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय गट्टा व संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय बामणी आदींचा समावेश आहे.
१ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्र संवेदनशील भागात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शासकीय आश्रमशाळा जारावंडी, भगवंतराव आश्रमशाळा बुर्गी, साईनाथ विद्यालय मालेवाडा, धनंजय स्मृती विद्यालय अंगारा, पांडव हायस्कूल येंगलखेडा, विदर्भ विद्यालय पोटेगाव, श्रीनिवास हायस्कूल अंकिसा, भगवंतराव हायस्कूल टेकडाताला, धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी, भगवंतराव आश्रमशाळा गट्टा, शासकीय आश्रमशाळा ताडगाव व शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा आदी केंद्रांचा समावेश आहे. इतर ठिकाणचे केंद्र सर्व साधारण आहेत.
त्या केंद्रांवर जिल्हाधिकाºयांचे पथक धडकणार
इयत्ता बारावीच्या परीक्षेवर जिल्हाधिकारी शेखर सिंह हे विशेष लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील एकाही परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार होऊ नये, यासाठी महसूल विभागाचे पथक गठीत करण्यात आले आहे. यामध्ये नायब तहसीलदार व महसूल निरिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी राहणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपी सारखा गैरप्रकार चालतो, अशा केंद्रांवर जिल्हाधिकारी सिंह हे स्वत: भेट देणार असल्याची माहिती आहे. कॉपी बहाद्दरांवर मंडळ नियमावलीनुसार कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व पथकांना दिले आहेत. या परीक्षेत नियुक्त केलेले परीरक्षक बदलणार आहेत. केंद्रावर प्रत्येक दिवशी नवा परीरक्षक राहणार आहे.

Web Title: For the HSC examination, five centers are sensitive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.