गारपिटीने उन्हाळी धानाचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:48+5:30
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य झाले आहे. अशातच रविवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीठ पाऊस झाला. सोबतच वादळी सुटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : रविवारी रात्री झालेल्या वादळ व गारपिटीमुळे देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर, उसेगाव, फरी या गावांमधील धान पिकाचे लोंब गळून पडले. त्यामुळे धानाचा सडा बांधीत पडला आहे. धानपीक निघण्याच्या स्थितीत असताना गारपिटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य झाले आहे. अशातच रविवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह गारपीठ पाऊस झाला. सोबतच वादळी सुटले.
गारपीट व वादळामुळे धानाचे लोंब गळून पडले. परिपक्व झालेल्या धानाचा सडा बांध्यांमध्ये पसरला होता. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघणे कठीण आहे. हातात आलेले पीक नष्ट झाले असल्याचे बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तेलंगणा राज्यातून आलेले मजूर शाळांमध्ये थांबले आहेत. पावसामुळे त्यांचे हाल झाले.
लोंबाला १० टक्केच धान शिल्लक
देसाईगंजचे तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम यांनी प्रत्यक्ष धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी धानाच्या लोंबाला केवळ १० टक्केच धान शिल्लक असल्याचे सांगितले. उन्हाळी धानाला सरासरी २५० पेक्षा अधिक धान राहतात. गारपीठीमुळे आता लोंबाला केवळ १० ते २० एवढेच धान शिल्लक आहेत. केवळ १० टक्के धान शिल्लक असल्याने एवढ्या धानासाठी धानाची कापणी, बांधणी व मळणी करणे अशक्य आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या धानाच्या पिकात जनावरे शिरवल्याशिवाय पर्याय नाही.
गारपीठीने नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती रोशनी पारधी, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, तहसीलदार डी. टी. सोनवाने, मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम आदी उपस्थित होते.
रविवारी पहाटे अवकाळी पाऊस
गडचिरोली : रविवारी रात्री व पहाटेच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाला. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यामुळे अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. आष्टी परिसरात सकाळी ८ वाजतापासून वादळवाºयासह पाऊस झाला. आलापल्ली परिसरातही सकाळीच पाऊस झाल्याने आलापल्ली येथील बाजारातील गर्दी कमी झाली. एटपपल्ली तालुक्यातही पाऊस झाला. गावाबाहेरच्या झोपड्यांमध्ये क्वॉरंटाईन असलेल्या मजुरांचे मोठे हाल झाले. धानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने रात्री ३ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला हे एमएसईबीचे अधिकारी सांगत नाही. त्यामुळे नागरिकांना केवळ वीज पुरवठा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते. मुलचेरा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. आष्टी परिसरातील मार्र्कंडा कं. ते मुलचेरा मार्गावर झाडे पडली. जेसीबीच्या सहाय्याने सदर झाडे बाजुला करून मार्ग मोकळा करण्यात आला. मानापूर देलनवाडी परिसरातही वादळी पाऊस झाल्याने रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता.
भाकरोंडी परिसरात ७ मे रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलु उडून गेले. भांसी येथील नागरिक शामराव सिताराम अलाम, ऋषी आत्राम, आशा अलाम व भाकरोंडी येथील वनिता प्रमोद जाळे यांच्या घरावरील कवेलु उडून गेल्याने नुकसान झाले.