अहेरी : श्रीमंत राजे विश्वेश्वराव आत्राम यांच्या दातृत्वाचे अनेक प्रसंग अहेरीकरांनी अनुभवले आहेत. त्यांच्या दातृत्वाची ख्याती विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली होती. त्यांच्या संस्कारातून अहेरी गावाची जडणघडण झाली. हे संस्कार आजही अहेरीच्या मातीत रूजलेले आहेत. जेव्हाजेव्हा गरजवंतांना मदतीचा हात देण्याची वेळ येते, तेव्हा या गावातील शेकडो नागरिक तेवढ्याच तत्परतेने मदतीसाठी धावून जातात. याचा प्रत्यंतर रविवारी अहेरीत आला.भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गाव असलेल्या बिनागुंडा येथील अशोक कोहला तिम्मा हा २० वर्षीय आदिवासी युवक अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याचे रुग्णालयात निधन झाले. मृतकासोबत त्याचा लहान भाऊही आला होता. भावाच्या मृत्यूची बातमी त्याला कळताच तो पुरता खचून गेला. शवविच्छेदनासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या खरेदीसाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते, आपल्या भावाचा मृतदेह वाहनातून बिनागुंडा येथे न्यावा लागणार आहे. याची माहिती त्याला देण्यात आली. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो सुन्न अवस्थेत बसून होता. ही बाब अहेरी, आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्त्यांना कळली. त्याच्या लहान भावाला धीर देण्यासाठी शेकडो हात धावून आले. हेल्पींग हॅन्डस अहेरी, फ्रेन्डस क्लब नवदुर्गा मंडळ आलापल्ली, महेबुबनगर चहा सेंटरचे नियमित ग्राहक व मित्रमंडळ, वन विभाग आलापल्लीचे दोन वनपरिक्षेत्राधिकारी व अहेरीच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परतेने आर्थिक मदतीसाठी रक्कम गोळा केली. शवचिच्छेदनाचा तसेच अहेरी ते बिनागुंडा प्रेत नेण्यासाठी येणाऱ्या वाहनाच्या खर्चाचा भाग उचलण्याची तयारी दाखविले. तसेच मृतक अशोकच्या भावाजवळही काही रक्कम सोपविण्यात आली. अहेरीच्या वैकुंठ रथाद्वारे त्याचे शव बिनागुंडा गावाकडे मार्गस्थ करण्यात आले.भामरागड पोलीस ठाण्याच्या मदतीने भामरागड ते लाहेरीपर्यंत वाहनाने त्याचा मृतदेह पाठविण्यात आला. लाहेरीपासून १८ किमी अंतर असलेल्या बिनागुंडाकडे मृतदेह सायकलवर खाट बांधून तर काही ठिकाणी बैलबंडीतून नेण्यात आला. अखेरीस हा मृतदेह बिनागुंडाला पोहोचविला. अहेरी व आलापल्लीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह त्याच्या गावापर्यंत जाऊ शकला, याचे समाधान मदत करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. अहेरीच्या मातीचा हा सुगंध कायम असाच विविध प्रसंगात दरवळत राहो, अशी भावना यावेळी मदतकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
प्रेताच्या प्रवासासाठी सरसावले शेकडो हात
By admin | Published: October 27, 2015 1:31 AM