गाेपाल लाजूरकर, गडचिराेली : ‘माझ्याकडे फक्त दोन एकर जमीन आहे. मला दोन मुले आहेत, एक मुलगा अपंग आहे. लाेहप्रकल्पासाठी आम्हाला जमीन द्यायची नाही. जमिनीच्या भरवशावरच आमचे पाेट आहे. जमिनीच्या बदल्यात माेबदला मिळत असला तरी पैसा आज आहे, उद्या नाही. प्रकल्पाला जमीन देऊन तर मी भूमिहीन हाेईन. म्हणून आमची जमीन हिसकावू नका’, अशी भावनिक साद विद्या कष्टी ह्या शेतकरी महिलेने आमदार डाॅ. देवराव हाेळी यांना घातली.
चामाेर्शी तालुक्यातील मुधाेली चक नं. २ येथे ७ जानेवारी रोजी प्रकल्पात जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांची भूमी अधिग्रहणसंबंधी बैठक आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्यासोबत पार पडली. याप्रसंगी मुधोली चक नं.२, जयरामपूर, सोमनपल्ली, गणपूर, मुधोली तुकूम, लक्ष्मणपूर येथील शेतकरी उपस्थित हाेते. दरम्यान उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्ही काेणत्या स्थितीत प्रकल्पासाठी जमिनी देणार नाही. आमच्या मागण्या शासनाकडे मांडाव्या, असे सांगत आमदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरणार :
लाेहप्रकल्पाला जमीन न देण्यासाबाबत शेतकऱ्यांनी आजपर्यंत चर्चा, निवेदन आणि अर्जाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. तरीसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात रस्त्यावर उतरून आमचे हक्क घेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या :
जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहण संदर्भात दिलेला आदेश रद्द करावा. शेतकऱ्यांच्या जमिनी मोजमाप करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना राेखावे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, असे सांगून पाेलिस निरीक्षक हे वेळाेवेळी धाक देऊन जमावबंदीचा आदेश काढत आहेत. त्यामुळे परिसरातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासननाला सूचना करावी, आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश हाेता.