शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकणार
By Admin | Published: August 4, 2015 01:11 AM2015-08-04T01:11:56+5:302015-08-04T01:11:56+5:30
तालुक्यातील देचली येथे पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून या आठ वर्गांसाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक
अहेरी : तालुक्यातील देचली येथे पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून या आठ वर्गांसाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत ४५ तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत ५५ असे एकूण सुमारे १०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र या वर्षी या शाळेत केवळ तीनच शिक्षक राहिले. तीन शिक्षकांना आठ वर्ग सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे किमान दोन शिक्षक आणखी देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी यापूर्वीही पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी पुन्हा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देऊन शिक्षकांची पदे तत्काळ भरावी, अशी मागणी केली आहे. १५ आॅगस्टपर्यंत शिक्षकांची पदे न भरल्यास १७ आॅगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. त्याचबरोबर सदर निवेदन पालकमंत्री, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षण समिती, उपाध्यक्ष, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)