किटाळी नदीघाटातून पोकलँड मशीनने रेतीचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:28 PM2017-11-20T22:28:48+5:302017-11-20T22:29:28+5:30
आरमोरी तालुक्यातील किटाळी येथील वैनगंगा नदीघाटातून रात्रीच्या सुमारास पोकलँड व जेसीबी मशीनच्या सहाय्याने दरदिवशी शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याने शासनाला लाखो रूपयांचा चुना बसत आहे.
आॅनलाईन लोकमत
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील किटाळी येथील वैनगंगा नदीघाटातून रात्रीच्या सुमारास पोकलँड व जेसीबी मशीनच्या सहाय्याने दरदिवशी शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याने शासनाला लाखो रूपयांचा चुना बसत आहे. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आरमोरी-गडचिरोली मार्गावरील किटाळी गावापासून दोन किमी अंतरावर वैनगंगा नदीघाट आहे. या नदीघाटाकडे जाण्यासाठी खडीकरण रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या मार्गावरून रात्रंदिवस ट्रक व टिप्परच्या सहाय्याने रेतीची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखडून गेली आहे. परिणामी या मार्गावर शेत असणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. २०१६-१७ यावर्षात या घाटाचा लिलाव झाला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली असून अजूनपर्यंत कंत्राटदाराला रेती उपसा करण्याचा परवाना मिळाला नाही. तरीही या रेती घाटातून रात्रीच्या सुमारास शेकडो ब्रॉस रेतीची चोरी केली जात आहे. वैनगंगा नदीची रेती उच्च दर्जाची असल्याने सदर रेतीला नागपूर व अनेक ठिकाणी मोठी मागणी आहे. किटाळी, वैनगंगा नदीघाटातून गेल्या दीड महिन्यात शेकडो ब्रॉस रेतीची चोरी झाल्याचे प्रत्यक्ष नदीघाटाला भेट दिल्यानंतर दिसून येते. एका कंत्राटदाराकडून रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून रेतीची चोरू होत असल्याची माहिती किटाळी येथील नागरिकांनी दिली आहे. महसूल विभागाच्या काही अधिकाºयांचा या अवैध रेती उपसाला हात आहे. नदीपात्रात पोकलँड व ट्रॅक्टर गेल्याच्या ताज्या खुणा दिसून पडतात. किटाळी परिसरातील नागरिकांनी रेती उपशाची माहिती मोबाईलद्वारे अधिकाºयांना दिले. मात्र याबाबीकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केले. रेती उपशाला आळा घालण्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही.
नदीपात्रात ज्या ठिकाणी रेतीचे खनन सुरू आहे, त्या जागेची लांबी, रूंदी व खोली आदींचा पंचनामा केल्यास किती ब्रॉस रेती नदीपात्रातून उपसा करण्यात आला आहे, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या प्रकरणाबाबत आरमोरीचे तहसीलदार यशवंत धाईत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.