सशक्तीकरण अभियानमध्ये गैरसोय, पाण्यासाठी धावाधाव; महिला, विद्यार्थी ताटकळले

By संजय तिपाले | Published: January 9, 2024 03:13 PM2024-01-09T15:13:09+5:302024-01-09T15:13:31+5:30

हजारोंच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन कोलमडले

Inconvenience in empowerment campaign, rush for water.. | सशक्तीकरण अभियानमध्ये गैरसोय, पाण्यासाठी धावाधाव; महिला, विद्यार्थी ताटकळले

सशक्तीकरण अभियानमध्ये गैरसोय, पाण्यासाठी धावाधाव; महिला, विद्यार्थी ताटकळले

गडचिरोली : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात ९ जानेवारी रोजी येथे सुरुवात झाली. यावेळी जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटर अंतरावरील सिरोंचापर्यंतच्या महिलांना बोलावण्यात आले होते, पण पाण्यावाचून विद्यार्थी, महिलांच्या घशाला कोरड पडली होती. तीन तासांपेक्षा अधिक वेळ ताटकळावे लागले, काहींना उन्हात रांगेत थांबावे लागले, त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. चारशे बस, शेकडो खासगी वाहनांतून हजारो महिलांना ९ जानेवारी रोजी शहरातील एमआयडीसी परिसरातील कोटगल रोड मैदानावर  एकाच छताखाली एकत्रित आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात गडचिरोली येथून होत आहे. यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिलांना एकत्रित आणण्यात आले.

मात्र, हजारोंच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन कोलमडले. सकाळी ११ वाजेच्या नियोजित कार्यक्रमासाठी १० वाजेपासून गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत मान्यवरांचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे महिला- विद्यार्थी ताटकळून गेले होते. पाण्यासाठी महिला, विद्यार्थी आसन सोडून धावाधाव करताना दिसून आले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमविण्यासाठी प्रशासनातील प्रमुखांनी तालुकास्तरावरील यंत्रणेला 'टार्गेट' दिले होते, अशी चर्चा असतानाच नियोजन कोलमडल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली. 

सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांकडून अडवणूक

दरम्यान, कार्यक्रमस्थळी प्रवेश देताना पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली अडवणूक केल्याचे दिसून आले. अनेक महिलांच्या पर्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. शाई फेकीच्या घटनांच्या धास्तीने अनेक जणांकडून पेन देखील काढून घेतले. काही महिला लहानग्यांना घेऊन आल्या होत्या, त्यांचेही हाल झाले.

Web Title: Inconvenience in empowerment campaign, rush for water..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.