आरमोरी : गरिबांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून अत्यल्प कमिशन दिले जात आहे. मागील १५ वर्षांपासून प्रतिक्विंटल ७० रूपये नफा स्वस्त धान्य दुकानदारांना दिला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची वाताहत होत आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसीलदार दिलीप फुलसंगे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागील १५ वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने स्वस्त धान्याचा वाहतूक खर्चही वाढला आहे. महागाईचा फटका स्वस्त धान्य दुकानदारांनाही बसत आहे. साखर वाटपावरही कमिशन दिले जात नाही. अनेकदा साखर वाटपात तूट होते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनाच तोटा सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. साखरेवर कमिशन देण्यात यावे, ट्रॅक्टर भाड्याची रक्कम वाढवून देण्यात यावी, दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अन्नधान्याची घट मंजूर करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादाजी माकडे, सचिव अनिल किरमे, सहसचिव रवींद्र निंबेकार, नादीरभाई लालानी, झलके, कोपुलवार, रामटेके, गिरडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राशन दुकानदारांचे कमिशन वाढवा
By admin | Published: October 30, 2014 10:51 PM