सार्वजनिक हातपंपाची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:17+5:302021-04-29T04:28:17+5:30
गडचिराेली : शहरात पालिकेतर्फे नळ पाणीपुरवठा केला जाताे. मात्र, उंच भागात व गाेकुलनगर परिसरात पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ...
गडचिराेली : शहरात पालिकेतर्फे नळ पाणीपुरवठा केला जाताे. मात्र, उंच भागात व गाेकुलनगर परिसरात पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागात हातपंप द्यावे, अशी मागणी होत आहे.
मार्गावरील झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यांवर अनेक झाडे आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते, झाडे तोडण्याची मागणी होत आहे.
कैकाडीवस्तीत समस्या
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक मतदान करतात.
उद्योग निर्माण करा
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठे उद्योग निर्माण झाले नाही.
नळ योजना कुचकामी
एटापल्ली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युतची सुविधा नाही. तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा. पं. च्या गावांमध्ये सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित केल्या आहेत. अनेक योजनांमध्ये बिघाड झाल्याने त्या बंद आहेत.
गॅसचे अनुदान वाढवा
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना विनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे बायोगॅसकरिता अनुदान देण्याची मागणी हा आहे.
वनहक्क पट्टे मिळेनात
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम- २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित आहेत.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशु सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंबकल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाले आहेत. या गटाराच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतूनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डंपिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार ?
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.
युवक गुंतले सट्टापट्टीच्या व्यवसायात
गडचिरोली : ग्रामीण भागात सट्टापट्टी सुरू आहे. अनेक युवक एजंट म्हणून सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गावर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही.
याेजनांची माहिती मिळेना
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याचे दिसून येते.
अतिक्रमणामुळे अपघात
धानोरा : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अतिक्रमणामुळे धानोरा शहर परिसरात दुचाकींचे अपघात वाढले आहेत.
कडेच्या वाहनांमुळे अपघाताचा धाेका
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने, या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही. परिणामी, योजनांपासून अनेक शेतकरी वंचित आहेत.
अगरबत्ती बनविण्याच्या मजुरीदरात वाढ करा
गडचिरोली : वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. मजुरी वाढविण्याची मागणी मजुरांकडून होत आहे.
अल्पवयीनांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई होत नसल्याने अल्पवयीन वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटीला फटका
अहेरी : जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी या दोन आगारांमार्फत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा संपूर्ण जिल्ह्यात चालविली जाते. गडचिरोली आगाराच्या १०५ व अहेरी आगाराच्या ६५ बसगाड्या दुर्गम भागात धावतात. मार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीचे नुकसान होत आहे.
पं.स. परिसरातील प्रसाधनगृहाची दुरवस्था
आरमाेरी : स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात घाण साचली आहे. भिंतीलाही विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, स्वच्छतेकडे पं. स. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीत ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येतात. प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
वनजमिनीवर अतिक्रमण ; जंगल धोक्यात
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वनविभागात अनेक नागरिकांनी वनजमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
जननी शिशु सुरक्षा योजनेची जागृती करा
गडचिरोली : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या जननी शिशु सुरक्षा योजनेचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला आहे. अनेक महिला शासनाच्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. आरोग्य विभागामार्फत या योजनेची प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने योजना मर्यादित आहे.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
रांगी : परिसरात प्रत्येक गावात प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या प्रवासी निवाऱ्यांकडे एसटी विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून बसची वाट बघत असल्याचे चित्र बघावयास मिळते.
आश्रमशाळेत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.ती भरण्याची मागणी होत आहे.