लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अवघ्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल २० जणांचा बळी घेतला. यातील अर्ध्याहून अधिक लोक दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी ते उपचार घेण्यासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. मृत्यूच्या या तांडवासोबतच नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांनीही मंगळवारी विक्रमी, म्हणजे एकाच दिवशी ३७० चा आकडा गाठला. आतापर्यंतच्या कोरोनाकाळातील ही जिल्ह्यातील सर्वाधिक भीषण स्थिती ठरली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी ११ महिने झाले आहेत. पण कोरोना पॉझिटिव्हचा आकडा इतका कधीच फुगला नाही. १५ दिवसांपूर्वीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या वर कधीच गेली नव्हती. मात्र गेल्या १५ दिवसात मृत्यू आणि नवीन बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. आता सक्रिय रुग्ण २ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सध्या त्यांची संख्या १९११ आहे. या भिषण स्थितीतही मंगळवारी गडचिराेलीचे मार्केट सुरू हाेते.नवीन ३७० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५०, अहेरी तालुक्यातील २३, आरमोरी २०, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २६, एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील ११, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये २१, मुलचेरा तालुक्यातील ५, सिरोंचा तालुक्यातील ३५ तर वडसा तालुक्यातील ३० जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या १०८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४४, अहेरी १०, आरमोरी २, मुलचेरा १, भामरागड २०, चामोर्शी ८, धानोरा १, सिरोंचा ३, कोरची २, कुरखेडा ३ तसेच देसाईगंज तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे.
अग्निसंस्कारासाठी जागा पडली अपुरी
लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या २४ तासात कोरोनाने बळी घेतलेल्या २० पैकी १४ जणांच्या मृतदेहांवर मंगळवारी गडचिरोलीच्या स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या प्रेतांवर अंतिम संस्कार करण्याची वेळ नगर परिषदेकडून नियुक्त संबंधित कर्मचाऱ्यांवर आली. यासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडल्याने कठाणी नदीच्या दोन्ही तिरांवर योग्य जागा मिळेल तिथे सरण रचावे लागले. जिल्ह्यात कोरोनाने १५७ जणांचा बळी घेतला आहे. मंगळवारी नोंद केलेल्या २० मृत्यूंपैकी दहा गडचिरोली जिल्ह्यातील, सात चंद्रपूर जिल्ह्यातील तर यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. त्यांच्यावर गडचिरोलीत अंत्यसंस्कार केले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मृतांमध्ये शहरातील गोकुलनगरातील ६४ वर्षीय महिला, कलेक्टर कॉलनीतील ७८ वर्षीय महिला, आरमोरीतील ५२ वर्षीय पुरुष, विसोरा, ता.देसाईगंज येथील ४० वर्षीय पुरुष, देसाईगंजमधील ५७ वर्षीय महिला, विहीरगाव येथील पुरुष, एक महिला, एकलापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, कुरखेडा येथील ६०वर्षीय पुरुष, नवेगाव कॉम्प्लेक्स येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मृतांमध्ये ६४ व ६५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, २७ वर्षीय आणि ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिला, नागपूरची ५० वर्षीय पुरुष आणि भंडारा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.