आपल्याच सवयी ठरतात मेंदूला घातक
By Admin | Published: November 15, 2014 10:47 PM2014-11-15T22:47:41+5:302014-11-15T22:47:41+5:30
तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व
गडचिरोली : तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व शोधांचे सगळे श्रेय मेंदूलाच जाते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मेंदूला जपताना कुठेतरी मागे पडताना दिसून येतो. हृदय, किडनी, डोळे इतकेच काय पण नखांनादेखील त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो.
मात्र खरेच किती जण आपला मेंदूदेखील निरोगी राहावा यासाठी प्रयत्न करतात? न्यूरोसर्जन्सचे तर हे मत आहे की प्रत्येकाला आपल्या मेंदूला कशामुळे त्रास होऊ शकतो व त्यापासून रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या सवयी कधी कधी मेंदूच्या समस्येला आमंत्रण देत असतात.
मेंदूला नुकसानकारक असणाऱ्या आपल्या सवयी
नाश्ता टाळणे : अनेक जणांची ही धारणा असते की सकाळी नाश्ता केल्याने पोटातील भूक कमी होते व त्याचा परिणाम जेवणावर होतो. मात्र आदल्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यापासून पोटात काहीही नसते. त्यामुळे ब्लडशुगरची पातळी खालावण्याचा धोका असतो. जर पातळी खाली गेली तर मेंदूला हवे असलेले घटक मिळत नाही आणि त्यामुळे मेंदूचे विकार होऊ शकतात.
अतिप्रमाणात खाणे : कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात खाणे हे चुकीचेच आहे. यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर प्रतिकूल परिणाम होऊन विचार शक्तीची क्षमता कमी होऊ शकते.
धूम्रपान : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि यामुळे अल्झेमर हा आजार होऊ शकतो.
जास्त गोड खाणे : अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्याने प्रथिने आणि पोषक द्रव्ये पूर्णपणे शोषल्या जात नाहीत व त्यामुळे कुपोषणाची शक्यता निर्माण होते. जर असे झाले तर मेंदूच्या विकास थांबतो.
हवेचे प्रदूषण : आपल्या शरीरात सर्वात जास्त प्राणवायू हा मेंदूला लागतो. जर सातत्याने प्रदूषणयुक्त हवेत श्वसन झाले तर मेंदूला योग्य प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नाही. मेंदूची कार्यक्षमता यामुळे कमी होते.
निद्रानाश : ज्यावेळी एखादी व्यक्ती झोपली असते तेव्हा मेंदूलादेखील आराम मिळतो. मात्र जर निद्रानाशाचा विकार जडला असेल किंवा बरेच दिवस कमी झोप घेतली तर मेंदूच्या पेशी नष्ट होतात.
डोक्यावरून चादर घेणे : रात्री झोपताना जर डोक्यावरून जाड चादर घेतली तर प्राणवायूचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही आणि कार्बन डाय आॅक्साईडचे प्रमाण वाढते. यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
जास्त विचार करणे : जर एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब असेल आणि त्यादरम्यान जास्त प्रमाणात वैचारिक काम झाले किंवा अति अभ्यास केला तर मेंदूच्या नसांवर ताण येऊ शकतो. (शहर प्रतिनिधी)