जिमलगट्टाचे आरोग्य केंद्र आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:39 AM2018-10-14T01:39:24+5:302018-10-14T01:41:04+5:30
अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा आहे. रूग्णवाहिकेची सुविधा नसून या आरोग्य केंद्राची सेवा मानसेवी डॉक्टरांच्या भरवशावर आहे. विविध समस्यांमुळे सदर आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे.
संजय गज्जलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा आहे. रूग्णवाहिकेची सुविधा नसून या आरोग्य केंद्राची सेवा मानसेवी डॉक्टरांच्या भरवशावर आहे. विविध समस्यांमुळे सदर आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे.
जिमलगट्टा, रसपल्ली, मेडपल्ली, येदरंजा, येर्रागड्डा, गोविंदगाव, मरपल्ली, उमानूर आदी परिसरातील गावांमधील रूग्ण औषधोपचारासाठी सदर आरोग्य केंद्रात येतात. मात्र जिमलगट्टा येथील आरोग्य केंद्रात अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. गट अ व गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. जून २०१८ मध्ये गट अ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मेश्राम हे या केंद्रात रूजू झाले. रूग्णालयाचा प्रभार हाती घेतल्यापासून चार महिन्यात केवळ दोनदा या आरोग्य केंद्राला भेट दिली.
डॉ. मेश्राम यांची सदर आरोग्य केंद्रात प्रतीनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. मानसेवी डॉक्टर म्हणून साई उपगणलावार यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प. सदस्य ऋषी पोरतेट यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. गेल्या चार महिन्यांपासून रूग्णांच्या सेवेसाठी असलेली रूग्णवाहिका नादुरूस्त स्थितीत आाहे. दुरूस्तीच्या कामासाठी येथील रूग्णवाहिकेला गडचिरोलीत नेऊन ठेवण्यात आले आहेत. दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून जिल्हास्तरावर गडचिरोली येथे या केंद्राची रूग्णवाहिका धूळखात पडली असल्याचे पोरतेट यांच्या भेटीदरम्यान आढळून आले. त्यामुळे येथे एनआरएचएफ अंतर्गत मानसेवी सुविधेसाठी असलेली भंगार अॅम्बुलन्स देण्यात आली आहे. ही रूग्णवाहिका सुध्दा वेळेवर सुरू होत नाही. धक्का मारून या रूग्णवाहिकेला सुरू करावे लागते.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हास्तरावरून औषधी उपलब्ध करून दिी जात नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेंतर्गत गरोदर मातांना पाच हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र मागील वर्षांपासून सदर अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला नसल्याची गंभीर बाब जि.प. सदस्य पोरतेट यांच्या निदर्शनास आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील समस्या जाणून घ्याव्यात. या रूग्णालयातील समस्या मार्गी लावून आरोग्य सेवा बळकट करावी, अशी मागणी पोरतेट यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे.
पंखे, झेरॉक्स मशीन, सोलर सिस्टीम बंद
सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रसुती गृह व इतर वार्डातील सर्व पंखे बंदस्थितीत आहेत. सदर केंद्राची झेरॉक्स मशीन व टीव्ही सुध्दा बंद आहे. लाखो रूपये खर्च करून सौरप्लेटची खरेदी करण्यात आली. मात्र सदर सौरप्लेट धूळ खात पडले आहे. परिणामी लहान मुलांसाठी येथे उपलब्ध असलेली वॅक्सीन खराब होऊन निकामी झाली आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षाच्या छताला पावसाळ्यात पाणी गळती लागते. येथील प्लास्टरचे तुकडे अधूनमधून खाली पडत असतात.