६८ किमीच्या अंतरासाठी ११२ किमीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:40 AM2021-09-25T04:40:21+5:302021-09-25T04:40:21+5:30
घोट : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात रस्ते विकासाला बऱ्याच प्रमाणात गती आली आहे. अनेक ठिकाणी पुलांचीही उभारणी होत आहे. ...
घोट : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात रस्ते विकासाला बऱ्याच प्रमाणात गती आली आहे. अनेक ठिकाणी पुलांचीही उभारणी होत आहे. मात्र चामोर्शी ते एट्टापल्ली यादरम्यान असलेल्या घोट, रेगडी, देवदा या मार्गावर अडसर बनून असलेल्या देवदा जवळील दिना नदीवरच्या पुलाचा प्रश्न अजूनही कोणी गांभीर्याने घेतलेला नाही. या पुलाची उभारणी झाल्यास ११२ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ६८ किलोमीटरवर येणार आहे.
आष्टी - आल्लापल्ली मार्गे एटापल्ली असा ११२ किलोमीटरचा प्रवास सध्या करावा लागत असल्याने वाहनधारकांना अंदाजे ४४ किलोमीटर जास्तीचा प्रवास करावा लागत आहे. त्यातून सर्वांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जिल्हा निर्मितीला ४० वर्ष पूर्ण होऊनही जिल्ह्यातील काही भाग अद्याप रस्ते व पूल विकासात मागे आहे. त्यापैकी चामोर्शी व्हाया घोट, एटापल्ली या मार्गाचा समावेश आहे. या ६८ किमीच्या मार्गावर घोट, निकतवाडा, नवेगाव, पोतेपल्ली, माडे आमगाव, पुसंगुड्डा, रेगडी, देवदा, बोलेपल्ली, चंदनवेल्ली, गेदा, जीवनगट्टा, एट्टापल्ली अशी जवळपास १२ गावे येतात.
एट्टापल्लीकडून गडचिरोलीकडे जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट पोटेगाव मार्गांने जातात. पण या मार्गावरील देवदाजवळील दिना नदीवर पूल बनविण्याकडे अद्याप कोणाचे लक्ष नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ही नदी लहान असल्याने पुलावर येणारा खर्च कमी येऊ शकतो. तरीही ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
या मार्गावरील नागरिकांना शासकीय कामासाठी असो की खासगी कामासाठी, चामोर्शी किंवा गडचिरोलीकडे जाण्यासाठी ४४ किलोमीटरचा अधिकचा प्रवास करून मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
(बॉक्स)
जीव मुठीत घेऊन प्रवास
आल्लापल्ली-आष्टी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारक या जवळच्या मार्गाचा अवलंब करतात. मात्र पावसाळ्यात या नदीवर पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढून प्रवास करतात. इतर ऋतूमध्ये हा मार्ग वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक या मार्गाचा अवलंब करतात. नाल्यावर पाणी असल्यास वाहतूक बंद असते. पाणी नसल्यास त्या मार्गाने दुचाकी, चारचाकी व मालवाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात जातात.
230921\29411913-img-20210923-wa0008.jpg
पुलीया नसल्याने.दिना नदीच्या पात्रातून जिव मुठीत घेऊन प्रवास करतांनी नागरीक