लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मानवाच्या मूलभूत गरजांपैकी निवारा ही महत्त्वाची गरज आहे. पूर्वी गावखेड्यात बारीक काैलारू छत असलेली घरे दिसायची, मात्र अलिकडे लाकूडफाटा सहजासहजी मिळत नाही तसेच वारंवार घर दुरुस्तीसाठी येणारा खर्च आदी कारणांमुळे बारीक काैलारू छताची घरे कुणीही बांधताना दिसून येत नाही. त्यामुळे ही घरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
५० वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये गवताचे छत असलेली घरे मोठ्या प्रमाणात होती. उन्हाळ्याच्या दिवसात या छताची दरवर्षी दुरुस्ती करावी लागत होती. त्यानंतर बारीक कवेलूंची मागणी वाढली. जवळपास २० वर्षांपासून बारीक कवेलू तयार करणाऱ्या कारागिरांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. कारण मोठे कवेलू कारखान्याच्या माध्यमातून तयार होऊ लागले. ह्या कवेलूचा वापरही काही दिवस झाला, मात्र मोठ्या कवेलूच्या छताची घरे तयार करण्यासाठी लाकडी फाटे, बांबू तसेच लाकूड मिळणे कठीण झाले. याला पर्याय म्हणून सध्या सिमेंट काँक्रिटची घरे बांधण्यावर भर दिला जात आहे. पक्क्या घरांमुळे दरवर्षी छताच्या दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चाची बचत झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सिमेंट काँक्रिटची घरे तापत असल्याने तिन्ही ऋतूत कवेलू व गवताच्या छताची घरे अधिक लाभदायक व सोयीस्कर ठरतात. मात्र, बदलत्या जीवनशैलीनुसार माणसानेही आपल्या निवाऱ्यात बदल केला. परिणामी काैलारू छतांची घरे आता नामशेष होत आहेत. माणसाची जीवनशैली व राहणीमान बदलल्याने आता घरांची रचनाही बदलली आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही विशिष्ट प्रकारची घरे बांधली जात आहेत. फूलझाडांमुळे घरासभोवतालचे वातावरण चांगले राहते. आरोग्यासाठी असे वातावरण लाभदायक आहे, हे महत्त्व पटल्याने मोठमोठ्या शहरांमध्ये तसेच जिल्हा व तालुका मुख्यालयात अनेकजण सिमेंट काॅंक्रिटची पक्की घरे बांधताना घराच्या समोर व मागील परिसरात विशिष्ट प्रकारची परसबाग तयार करत आहेत.
बाॅक्स
ग्रामीण भागातही घरांना येत आहे नवा लूक
शहरासह आता ग्रामीण भागातही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तसेच आजुबाजूला पपई, अशोका व इतर झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. घरालगत मोकळ्या जागेत विविध प्रजातीची फुलझाडे, फळझाडे, अन्य प्रकारची झाडे लावली जात आहेत. गावखेड्यातही कधी न दिसणारे मुख्य प्रवेशद्वार आता तयार केले जात आहे. शिवाय ग्रामीण भागात पोर्च, बेडरूम, किचन, बाथरूम, शौचालय व इतर सोयी-सुविधांनीयुक्त घरांची निर्मिती केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही आता घरांना नवा लूक येत असल्याचे दिसून येते.