रोजगारासाठी मजुरांचे छत्तीसगडमध्ये स्थलांतर
गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामासाठी छत्तीसगड व तेलंगणा राज्यात स्थलांतर करत आहेत. सदर मजूर तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत परतणार नाहीत. गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.
आसरअलीतील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात. परंतु मागील एक महिन्यापासून येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत होत आहे. विद्युत पुरवठाही खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु ही समस्या सोडविण्याकडे दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्राहकांकडून होत आहे.
अंकिसात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
अंकिसा : शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु अंकिसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सर्वत्र प्लास्टिक, कचरा, काचेच्या बाटल्या व अन्य कचरा दिसून येतो. येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणी म्हणून ओळख असलेल्या अंकिसा येथून आसरअल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. रस्ता रूंद असल्यामुळे गावातील अनेक नागरिक येथील कचरा गावाबाहेर रस्त्याच्या कडेला फेकतात.
मुलचेराला जोडणारे मार्ग खड्डेमय
मुलचेरा : तालुक्याला जोडणाऱ्या अहेरी, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलचेरा तालुक्यात ६८ गावांचा समावेश आहे. देशबंधू ग्राम मार्गे तहसील कार्यालय, महाराष्ट्र बँक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, सहकारी बँक, अन्न पुरवठा गोदाम, कोषागार कार्यालय, भगवंतराव कॉलेज आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दोन तलाव आहेत. या तलावाचा दरवर्षी लिलाव होतो. लिलावानंतर काही नागरिक मासे सोडतात. परंतु संपूर्ण तलावाला इकॉर्निया वनस्पतीने विळखा घातल्याने तलावातील पाणी साठवणुकीवर परिणाम होत आहे. शिवाय येथे मासेमारी करण्यास अडचणी येत आहेत.
शेळी पालनाने मिळाला रोजगार
सिरोंचा : दुर्गम भागातील बचत गटांना शासनाने शेळ्यांचे वाटप केले आहे. या शेळ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत झाली आहे.
लखमापूर बोरीत गतिरोधकाचा अभाव
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथील बसस्थानक परिसरातील शिवाजी चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. चामोर्शी-आष्टी मार्गावर लखमापूर बोरीतील सदर शिवाजी चौक असल्याने येथे गतिरोधकाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जेणेकरून अपघाताला आळा बसेल.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र या चारही मार्गावर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी आहे.
टिल्लूपंप लावणारे कारवाईपासून दूर
गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डात टिल्लूपंप लावून अवैधरित्या पाणी ओढले जात आहे. परिणामी अनेक वॉर्डातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना केवळ पाच ते सहा गुंड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. नळाला पाणी आल्यानंतर अनेक नागरिक छुप्या पद्धतीने लावलेला टिल्लूपंप सुरू करतात. त्यानंतर नळाचे पाणी स्लॅबवरील टाकीमध्ये सोडतात. क्षमतेपेक्षा अधिक पाणी टिल्लूपंपाद्वारे ओढले जात असल्याने नागरिकांना अत्यल्प पाणी मिळते.
ग्रामीण भागात पक्ष्यांच्या शिकारीत वाढ
कुरखेडा : पाणी टंचाई जाणवू लागत असल्याने पक्षी गावालगत तलावात पाणी पिण्याकरिता येत असतात. अशावेळी काही नागरिक रात्रीच्या सुमारास जाळाच्या सहाय्याने झाडावरील पक्षी पकडत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्तीचे करा
आलापल्ली : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचिरोली, चामोर्शी येथे राहून ये-जा करतात. रात्रीच्या सुमारास बिघाड निर्माण झाल्यास हा बिघाड दुरूस्त करणे शक्य होत नाही.
अनेक गावांना विहिरीच्याच पाण्याचा आधार
आलापल्ली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या केवळ १९.५० लोकसंख्याच नळाचे पाणी पिण्यासाठी वापरते. उर्वरित जनतेला विहीर, हातपंपाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने नियमितपणे विहीर व हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. त्यामुळे सदर पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याचे आढळून आले आहे.
सॅटेलाईटवरील टॉवर ठरताहेत कुचकामी
गडचिरोली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बीएसएनएलएने सॅटेलाईटवर चालणारे टॉवर निर्माण केले आहेत. मात्र सदर टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावात टॉवर सॅटेलाईटवर चालविला जात आहे. या गावापर्यंत केबल पोहोचले नसल्याने सॅटेलाईटच्या माध्यमातून टॉवर चालविले जात आहे. कोटगूल गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजार आहे. या गावात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही अतिशय कमी आहे.
दोन अभयारण्याचे प्रस्ताव थंडबस्त्यात
गडचिरोली : कोरची तालुक्यातील टिपागड व भामरागड येथे अभयारण्य निर्माण करण्यात येणार होते. टिपागड अभयारण्याला स्थानिक ग्रामसभांनीही विरोध दर्शविला होता. सध्या हा प्रस्ताव वन विभागाकडे प्रलंबित पडून आहे. यासंदर्भात शासन व लोकप्रतिनिधींनीही कमालीचे असंवेदनशील आहे.
सागवानी लाकडाची मागणी वाढली
एटापल्ली : लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. वर-वधूंना आहेर देण्यासाठी लाकडी वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कारागिरांनी फेब्रुवारीपासूनच सागवानी लाकडापासून वस्तू बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सागवानी लाकडाची प्रचंड मागणी वाढली आहे. पावसाळ्याच्या तुलनेत सागवानी लाकडाचे भाव दुप्पट झाले आहेत.
वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवा
चामोर्शी : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धुरळणी करण्याची मागणी
धानोरा : अनेक वर्षांपासून धुरळणी झाली नाही. वाढणाऱ्या डासांच्या पैदासीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुरळणी करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मात्र नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.