गडचिरोली : गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांना तब्बल तिसऱ्यांदा आणि कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी अपात्र ठरविण्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला. मात्र आता पिपरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.
त्यांना या आदेशापासून ६ वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच मुख्याधिकारी व लेखापाल यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याबाबत प्रशासकीय कारवाई सुरू करण्याचे आदेशात म्हटले आहे. नगर परिषद सभेच्या मंजुरीशिवाय प्रतिपूर्ती बिल घेतल्याचा ठपका पिपरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वीसुद्धा पिपरे यांच्यावर नगर विकास मंत्रालयाने दोनवेळा अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. पण दोन्हीवेळी पिपरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागून मंत्रालयाचा आदेश रद्दबातल ठरविला होता.