राठोडच्या कारभाराची अजबच लीला
By admin | Published: November 15, 2014 01:39 AM2014-11-15T01:39:39+5:302014-11-15T01:39:39+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथील सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय राठोड याला बुधवारी गडचिरोली ...
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथील सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय राठोड याला बुधवारी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. राठोडला गडचिरोली न्यायालयात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्प कार्यालयात कार्यरत सहाय्यक लेखाधिकारी राठोड याच्या कारणाम्याचे अनेक प्रकरण या घटनेनंतर आता चर्चेला आले आहे. गडचिरोली शहरातील अनेक शिक्षण संस्थांना आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची गडगंज रक्कम पोहोचविण्यासाठी राठोड अथक परिश्रम पैशाच्या लोभापायी करीत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या शिक्षण संस्थांनी समाज कल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाकडे आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या नोंदवून दोनही ठिकाणावरून मोठ्या शिष्यवृत्तीच्या पोटी मिळणाऱ्या रकमा गडप केल्या आहे. आदिवासी विकास विभागात अशा संस्थांना राठोड पूर्ण मदत करीत होते. यातील काही संस्थांनी आदिवासी विकास विभागाकडे नोंदविलेली पटसंख्या व समाज कल्याण विभागाकडे नोंदविलेली पटसंख्या ही तफावत दाखविणारी आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून गडचिरोली शहरातील काही संस्थांचा हा धंदा जोरात सुरू होता. या संस्थांना सर्व मार्गदर्शन राठोड यांचेच मिळत होते, अशी माहिती पुढे आली आहे. काही संस्थांनी तर आपल्या पटसंख्येपेक्षाही अधिक शिष्यवृत्ती आदिवासी विकास विभागाकडून उचल केली, याला राठोड यांचेच सहकार्य कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे.