अधिकृत वीज जोडणीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:25 PM2019-09-02T23:25:35+5:302019-09-02T23:26:36+5:30
जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ढोलताशांच्या गजरात यावर्षीही सार्वजनिक मंडळे व खासगीरित्या अनेकांनी गणरायाची १० दिवसांसाठी प्रतिष्ठापणा केली. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, मात्र महावितरण कंपनीकडे अधिकृत वीज पुरवठ्यासाठी जिल्हाभरातून केवळ १४ अर्ज प्राप्त झाले आहेत. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने यावर्षीही रोषणासाठी अनधिकृत वीज पुरवठा घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सवलत सुध्दा दिली जाते. तरीही बहुतांश गणेश मंडळे जवळपासच्या एखाद्या वीज तारेवर हुक लटकवून वीज पुरवठा घेत असल्याचे दिसून येते.
वीज जोडणीसाठी गडचिरोली विभागांतर्गत २ सप्टेंबरपर्यंत १२ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार मंडळांनी पैसे भरल्याने त्यांना अधिकृत वीज पुरवठा देण्यात आला आहे. एका मंडळाने पैसे भरले नाही. १२ अर्जांपैकी सात अर्ज २ सप्टेंबर रोजी उपलब्ध झाले. त्यांना वीज पुरवठा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आलापल्ली विभागांतर्गत केवळ दोन मंडळांनी अर्ज केले होते. या दोन्ही मंडळांना वीज पुरवठा दिला आहे.
गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सूट दिली जाते. अधिकृत वीज पुरवठा घेतल्यास विद्युत संचाची जोडणी योग्य आहे किंवा नाही, याची शहनिशा महावितरणचे अधिकारी करतात. सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते. यावर्षी पाऊस येत आहे. त्यामुळे वीज तारांवर हुक लटकवून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मंडळांनी अजुनही वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला नाही, त्यांनी अर्ज करावा व अधिकृत वीज पुरवठा घ्यावा. अनधिकृत वीज पुरवठा असलेल्यांवर यावर्षी नक्कीच कारवाई केली जाईल.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता,
महावितरण गडचिरोली