देसाईगंज : अवैध दारू व्यावसायिकांविरूद्ध उघडलेल्या मोहिमेत देसाईगंज पोलिसांनी दि.१० रोजी विसोरा गोपाळटोली येथे एक लाख रुपयाचा मोहसडवा जप्त केला. येथील पोलीस स्टेशनचा पदभार हाती घेताच नवीन ठाणेदार डॉ. विशाल जयस्वाल यांनी अवैध दारूविक्रीच्या विरोधात धरपकडसत्र सुरू केले. त्यामुळे शहरातील काही दारूकिंग भूमिगत झाले आहेत.
शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात त्यांनी मोहीम उघडल्याने दारूविक्रेत्यांची दाणादाण उडत आहे. सध्यातरी देसाईगंज शहर व ग्रामीण भाग दारूमुक्त झाल्यासारखे चित्र दिसून येत आहे. अवघ्या आठवडाभरातील कारवायांमुळे अनेकांवर चांगलीच जरब बसविण्यात पो. निरीक्षक विशाल जयस्वाल यांना यश आले. दि.१० च्या कारवाईत पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा यांच्या मार्गदर्शनात विसोरा गोपाळ टोली येथे १० प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधील मोहसडवा अंदाजे (अंदाजे किंमत एक लाख रुपये) जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. ही कारवाई डॉ. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात एपीआय रूपाली बावणकर, पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर, सुजाता भोपळे, उपनिरीक्षक नाईक यांनी केली. या कारवाईत एक वाहन (एमएच ४९, एटी ६७५७) तसेच चालक सुरेश कोंडविलकर रा. निपंद्रा जि.चंद्रपूर, हल्ली मुक्काम ब्रम्हपुरी याला अटक करण्यात आली.
या धडक कारवायांमुळे वाॅर्डावाॅर्डातील महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी दारुड्यांपासून होणाऱ्या त्रासातून सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.