वैरागड : आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील गावांच्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वैलोचना नदीच्या पुलावरून मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, मांगदा, अंगारा, मालेवाडा, डोंगरतमाशी, वडेगाव, पिसेवडधा व २५ गावातील वाहतूक सुरू असते. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात थोडाजरी पाऊस आला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी सदर मार्ग पूर्णत: ठप्प होतो. याशिवाय पुलापलिकडील गावांचा आरमोरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. अनेकदा पावसाळ्यात या पुलावरून ८ ते १० फूट पाणी वाहते. वैरागड येथील शेतकऱ्यांच्या पुलांच्या पलिकडे शेतजमिनी आहेत. मात्र पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नदीपलिकडील शेतकऱ्यांना शेतावर पोहोचता येत नाही. वैलोचना नदीवरील या पुलाची अनेकदा तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन शासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही. पुलाचे खांब उभारण्यासाठी उन्हाळ्यात महिनाभर सर्व्हेक्षण देखील करण्यात आले मात्र १५ वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाही. (वार्ताहर)
कमी उंचीच्या पुलाची समस्या कायम
By admin | Published: November 04, 2014 10:41 PM