एमए शिकलेली किरण बनली टॅक्सी ड्रायव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:00 AM2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:36+5:30
हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चारचाकी टॅक्सी (जीप) चालवत आहे.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील २३ वर्षीय युवती किरण रमेश कुर्मा ही स्वत:चे प्रवासी वाहन चालवून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला हातभार लावत आहे. तिने दाखविलेली ही हिंमत इतर बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चारचाकी टॅक्सी (जीप) चालवत आहे.
रेगुंठा ते सिरोंचादरम्यान किरण व तिच्या वडिलांच्या टॅक्सी चालतात. हा ६० किमीचा मार्ग घनदाट जंगलाने व्यापलेला व दऱ्याखोऱ्यांचा आहे. मात्र किरण न डगमगता वेगात आपली टॅक्सी पुढे हाकते. स्वत:ची कार चालविताना अनेक महिला पहायला मिळतात. मात्र प्रवाशी वाहन चालविणारी किरण ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला चालक असावी.
लोकमतने तिला विचारले असता, या व्यवसायात युवतींना कोणतीही अडचण नाही. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच युवतींनी सुध्दा या व्यवसायात उतरून स्वत:ला सिध्द केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.
तीन टॅक्सींची आहे मालक
किरणने वडिलाला व्यवसायात साथ दिल्यामुळे टॅक्सीचा व्यवसाय आणखी बहरला. किरणने टॅक्सी चालवायला सुरूवात केली तेव्हा पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे केवळ एकच टॅक्सी होती. मात्र किरणने या व्यवसायातून आणखी दोन टॅक्सी खरेदी केल्या. आज ती तीन टॅक्सींची मालक आहे.