Maharashtra Election 2019 ; उमेदवारांचे लक्ष ग्रामीण भागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:25+5:30
खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यात भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुन्हा राज्यात भाजप सरकार आल्यास यापेक्षाही जास्त कामे होतील, असे सांगितले. सोबतच जिल्ह्यात भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून दुर्गोत्सवाच्या धामधुमीत असणारे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दुर्गा विसर्जनानंतर गुरूवारी मोकळे झाले. यासोबतच उमेदवारही गावोगावी प्रचार करण्यासाठी सज्ज झाले. काही प्रमुख उमेदवारांनी सध्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करत गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. परंतू शहरी भागात मात्र प्रचाराचा लवलेश नसल्यामुळे सर्वत्र सामसूम आहे. अद्याप कोणत्याही उमेदवाराचे फलकसुद्धा नजरेस पडणे दुर्मिळ झाले आहे.
कमी वेळेत जास्त गावे पालथी घालण्याच्या नादात उमेदवारांचा मॅरेथॉन प्रचार सुरू आहे. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीपर्यंत गावोगावी भेटी देऊन कॉर्नरसभा किंवा गावपुढाऱ्याच्या घरी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन ‘मीच तुमचा तारणहार’ हे सांगण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. यात गावपुढाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मात्र काँग्रेस आणि भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांच्या दौºयांचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी हेलिपॅडपासून तर विविध परवानग्यांसाठी पक्षीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.
विकासाच्या मुद्यावर निवडणूक
खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यात भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुन्हा राज्यात भाजप सरकार आल्यास यापेक्षाही जास्त कामे होतील, असे सांगितले. सोबतच जिल्ह्यात भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. या पत्रपरिषदेला नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र यावेळी भाजपचे कोणीही उमेदवार उपस्थित नव्हते.
कोणाचे नाव कोणत्या नंबरवर याची उत्सुकता
सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर मतदार यंत्रावरील मतपत्रिकेवर त्यांचे नाव कोणत्या क्रमांकावर राहणार हे सांगण्यात आले. निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार राष्ट्रीय, राज्य आणि नोंदणीकृत पक्ष तथा अपक्ष अशा क्रमाने उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मतदारांना आपले नाव कोणत्या क्रमांकावर आहे हे ठळकपणे लक्षात यावे यासाठी उमेदवारांकडून डमी मतपत्रिका छापून त्याचेही घरोघरी वाटप करण्यास गुरूवारी सुरूवात झाली.
अहेरीत ‘वंचित’चा उमेदवारच वंचित
पक्षीय नेत्यांच्या प्रचारात गुरूवारी वंचित बहुजन आघाडीने पहिली सभा घेतली. पक्षाचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या या सभेला गडचिरोली आणि आरमोरीतील उमेदवार हजर असले तरी अहेरीचे उमेदवार अॅड.लालसू नागोटी अनुपस्थित होते. उमेदवारच नसल्यामुळे त्यांच्या मतदार संघातील श्रोतेही नव्हते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याची सभा असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे मतदार नेत्याच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिल्याने हा चर्चेचा विषय होता.