Maharashtra Election 2019 ; आघाडी-युतीत सहकारी पक्ष बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महायुती’ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांमिळून तयार झालेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महायुती’ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महाआघाडी’ यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा महासंग्राम लढल्या जात आहे. परंतू जिल्ह्याच्या तीनही मतदार संघात महायुती किंवा महाआघाडी नावालाच असून प्रत्यक्षात प्रचारात युती-आघाडीतील मित्रपक्ष बेदखल झाले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत त्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराच्या सर्व जबाबदाºया दिल्या जात आहे.
भाजप-सेनेच्या महायुतीत रिपाइं (आठवले), शिवसंग्राम पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना हे पक्ष आहेत. त्यापैकी रिपाइं (आठवले) वगळता इतर पक्षांचे गडचिरोली जिल्ह्यातील अस्तित्व नगण्य आहे. मात्र रिपाइं (आठवले)च्या नेत्यांनाही प्रचारात फारसे महत्व मिळताना दिसत नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत पिरिपा, आरपीआय (कवाडे गट), भाकपा, शेकाप या पक्षांचा समावेश आहे. पण गडचिरोली आणि अहेरी मतदार संघात शेकापने वेगळी चूल मांडली आहे. आरमोरीत भाकपा तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या तीनही मतदार संघात महाआघाडीतील पक्षांची फाटाफूट झाली आहे. एकमेव शिल्लक असलेल्या रिपाइं (कवाडे) गटाला पक्षात फारसे मानाचे स्थान मिळताना दिसत नाही. त्यामुळे दोन्हीकडील बहुतांश सहकारी पक्ष बेदखल झाले आहेत. स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन आघाडी व युतीचे उमेदवार प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते येणार का?
जिल्ह्यात भाजपने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या दोन सभा झाल्या. इतर नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू आहे. पण काँग्रेसकडून अद्याप कोणीही मोठ्या नेत्याच्या सभा झालेल्या नाही. कोण स्टार प्रचारक येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव उमेदवार असलेले धर्मरावबाबा आत्राम हे आपला गड एकाकीपणे लढवत असून कोणी मोठ्या नेत्याची सभा होण्याची शक्यता नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेडाम यांची अटक टळणार की, जामीन नाकारणार? आज निर्णय
माजी आमदार आणि आरमोरी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम व त्यांच्या पुत्राकडून एका अपक्ष उमेदवाराच्या अपहरण प्रकरणाचे पडसाद निवडणुकीत पडत आहे. त्यांच्या अटकेची मागणी तक्रारकर्त्याकडून करण्यात आली मात्र १३ पैकी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. सर्वजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान गेडाम यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत सोमवारी न्यायालयाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.