Maharashtra Election 2019 ; पहिले मत दारूमुक्त गडचिरोलीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:38+5:30
युवा हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. बळकट लोकशाहीसाठी हा आधारस्तंभ व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्यासाठी शासकीय-निमशासकीय संस्था जनजागृती करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील युवक युवतींनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील दारूबंदी टिकविण्यासाठी नेतृत्वही दारूमुक्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे आमचे पहिले मत दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या उमेदवारालाच देण्याचा निर्धार जिल्ह्यातील १६ महाविद्यालयातील तब्बल २ हजार युवक युवतींनी व्यक्त केला आहे.
युवा हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. बळकट लोकशाहीसाठी हा आधारस्तंभ व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्यासाठी शासकीय-निमशासकीय संस्था जनजागृती करीत आहे. पण याहीपुढे जाऊन सशक्त लोकशाहीसाठी ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी सर्च संस्थेच्या जीवन शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.
महाविद्यालयीन बहुतेक युवक युवतींचे हे पहिलेच मतदान असणार आहे. त्यामुळे त्यांनी मतदानाचा पहिलाच अधिकार विचारपूर्वक बजावण्यासाठी सर्च संस्थेच्या चमूद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण चोरून लपून दारूची विक्री होत आहे. याचा त्रास जिल्ह्यातील जनतेला भोगावा लागतो. निवडणूक काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याबाबत सर्च संस्थेची चमू महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन करीत आहे. आतापर्यंत गडचिरोली, चामोर्शी, आष्टी, धानोरा येथील तब्बल १६ महाविद्यालयातील दोन हजार युवक युवतींनी या अभियानात सहभागी होत दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. दारूमुक्त गडचिरोलीसाठी पहिले मत दारूमुक्त उमेदवारालाच देण्याचा निर्धार युवांनी केला आहे. गावागावात युवकांकडून दारुमुक्त निवडणुकीसाठी जनजागृती सुरू आहे.