दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम गडचिरोली विधानसभा क्षेत्रात तापायला लागल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून प्रचारासाठी विविध साधनांचा वापर केला जात आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. गडचिरोली मतदार संघात भाजप, काँग्रेससह इतर पक्ष व सर्व उमेदवारांनी मिळून एकूण ५६ प्रचार वाहनांची अधिकृत परवानगी मिळविली आहे.गडचिरोली विधानसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. उमेदवारांना अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर दुसºया दिवशीपासून खुल्या प्रचारास सुरूवात झाली आहे. पोस्टर, बॅनर, पॉम्प्लेट, टी-शर्ट, दुपट्टे आदी प्रचार साहित्य घेऊन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहनाने ग्रामीण भागातील गावे पिंजून काढत आहेत. १२ ऑक्टोबरला शनिवारपर्यंत निवडणुकीतील सर्व उमेदवारांकडून मिळून एकूण ५६ वाहनांना निवडणूक विभागाने परवानगी दिली. यामध्ये भाजपचे उमेदवार डॉ.देवराव होळी यांच्या प्रचाराची १७ वाहने, काँग्रेसच्या डॉ.चंदा कोडवते यांची १२ वाहने, संभाजी ब्रिगेडचे उमेदवार दिलीप मडावी यांनी ७ वाहनांना रितसर परवानगी घेतली. याशिवाय इतर पक्ष व अपक्षांनी काही वाहनांची परवानगी घेतली आहे.प्रचाराच्या वाहनांची अधिकृत परवानगी घेण्यासाठी संबंधित उमेदवारांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना चालक परवाना, आरसी बुक, वाहनांचा परवाना, चालकाचे आधारकार्ड आदी दस्तावेजासह उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आरटीओकडून या सर्व बाबीला मान्यता मिळाल्यानंतर त्याची शहानिशा निवडणूक विभागाकडून केली जाते. परिवहन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र आणल्यानंतर निवडणूक विभागाकडून संबंधित प्रचार वाहनांना रितसर परवानगी दिली जाते. या वाहनांचे भाडे, डिझेल व इतर खर्चांचा हिशेब निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.गडचिरोली विधानसभा मतदार संघात चामोर्शी, गडचिरोली व धानोरा या तीन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांची मिळून एकूण ५६ अधिकृत वाहने या तीन तालुक्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी धावत आहेत. यामध्ये स्कॉर्पिओ, टाटा-एस, सफारी, झायलो, पिकअप महिंद्रा, ऑटो, टाटा सुमो आदी वाहनांचा समावेश आहे. दररोज सकाळी ८ पासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १६ तास उमेदवारांची प्रचार वाहने रस्त्यावरून धावत आहेत.१९ ला सायंकाळी भोंगा बंद होणारउमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या गडचिरोली मतदार संघातील १६ उमेदवारांना ७ ऑक्टोबर रोजी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ८ आॅक्टोबरला मंगळवारी विजयादशमी सण आला. त्यामुळे उमेदवारांनी ९ ऑक्टोबर बुधवारपासून वाहनांद्वारे खुल्या प्रचारास प्रारंभ केला. मात्र सुरूवातीचे दोन दिवस अपेक्षित सर्व वाहनांना आरटीओ व निवडणूक विभागाकडून परवानगी मिळाली नाही. १२ ऑक्टोबर शनिवारपर्यंत सर्व उमेदवारांच्या मिळून एकूण ५६ वाहनांना अधिकृत परवानगी देण्यात आली. १९ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजतानंतर उमेदवारांचा खुला प्रचार बंद होणार आहे. आता उमेदवारांकडे प्रचारासाठी केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. कमी दिवसात अधिकाधिक गावे पिंजून काढण्यासाठी प्रचार वाहनांचाही वेग वाढवावा लागणार आहे.रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होताहे टाईमपासगडचिरोली विधानसभा मतदार संघातील निम्म्या गावांना जाण्यासाठी रस्ते बऱ्यापैकी आहेत. मात्र धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातील बहुतांश गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. चामोर्शी तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. गडचिरोली तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे कमी वेळात अधिक गावांचा दौरा करण्यासाठी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांचा बराच वेळ जात आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रचार वाहनांची गतीही काही ठिकाणी मंदावत असल्याचे दिसून येते. परिणामी जुन्या स्वरूपाची प्रचार वाहने खड्ड्यांमुळे भंगार होत असल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra Election 2019 ; गडचिरोलीत ५६ वाहने उडवताहेत उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:00 AM
गडचिरोली विधानसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. उमेदवारांना अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून खुल्या प्रचारास सुरूवात झाली आहे. पोस्टर, बॅनर, पॉम्प्लेट, टी-शर्ट, दुपट्टे आदी प्रचार साहित्य घेऊन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहनाने ग्रामीण भागातील गावे पिंजून काढत आहेत.
ठळक मुद्देभाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक वाहने : १६ तासाहून अधिक वेळ धावताहेत रस्त्यावरून