Maharashtra Election 2019 ; प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांचाच राबता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:49+5:30
प्रचाराचे टप्पे ठरविताना जिल्हा परिषदेच्या क्षेत्रानुसार विभाजन करण्यात आले आहे. दोन वाहने एका जिल्हा परिषद क्षेत्रासाठी एकाच दिवशी पाठविली जात आहेत. संबंधित वाहन संपूर्ण गावांना भेटी देते किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी एक पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा पाठविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा क्षेत्रात प्रचाराचे सूत्रसंचालन करण्याबरोबरच गावखेड्यातून येणारे कार्यकर्ते, वाहनचालक व इतर पदाधिकारी यांना थोडीफार विश्रांती मिळावी, यासाठी बहुतांश उमेदवारांनी प्रचार कार्यालये उघडली आहेत. या कार्यालयांमध्ये सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा राबता रहात असल्याचे दिसून येते.
प्रचारासाठी अवघा १२ दिवसांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत विधानसभा क्षेत्रातील ३०० पेक्षा जास्त गावांना भेटी देण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. मात्र प्रत्येकच गावी उमेदवार पोहोचणे शक्य होत नसल्याने कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते. प्रत्यक्ष उमेदवार जरी गावापर्यंत पोहोचला नसला तरी उमेदवाराचे छायाचित्र, निवडणूक चिन्ह व वचननामा असलेले बॅनर, पोस्टर्स, टोप्या, प्रत्येक गावापर्यंत पोहोचविल्या जातात. तसेच वाहनावर ध्वनीक्षेपक लावून उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. यासाठी प्रत्येक प्रमुख पक्षाकडून ३० पेक्षा अधिक वाहने वापरली जात आहेत.
प्रचाराचे टप्पे ठरविताना जिल्हा परिषदेच्या क्षेत्रानुसार विभाजन करण्यात आले आहे. दोन वाहने एका जिल्हा परिषद क्षेत्रासाठी एकाच दिवशी पाठविली जात आहेत. संबंधित वाहन संपूर्ण गावांना भेटी देते किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी एक पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा पाठविला जात आहे. स्थानिकस्तरावरील कार्यकर्त्यांकडून आलेल्या मागणीनुसार टोप्या, बॅनर, पोस्टर्स पाठविले जात आहेत. हे सर्व वितरित करणे व चिटकविणे याची जबाबदारी संबंधित कार्यकर्त्यावर सोपविली आहे.
शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोलीतील काँग्रेस प्रचार कार्यालयाला लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता, काँग्रेसचे जि.प.सदस्य व पदाधिकारी बसले होते. आपसात चर्चा करून प्रचाराचे नियोजन केले जात होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास भाजपा कार्यालयाला भेट दिली असता, याही कार्यालयात पदाधिकारी बसून नियोजन करीत होते.
कार्यकर्त्यांमार्फत घेतला जातो मतदारांच्या अपेक्षांचा अंदाज
निवडणूक व्यवस्थापन प्रमुख हे महत्त्वाचे पद आहे. सकाळी प्रचार कार्यालयातून निघालेले कार्यकर्ते व वाहने संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत प्रचार कार्यालयात परत येतात. निवडणूक व्यवस्थापन प्रमुख या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणत्या भागात प्रचार झाला, मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे, याचा आढावा घेत आहेत. तेथील मतदार कशाची मागणी करीत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणती आश्वासने दिली जावी, यावर चिचारमंथन करून दुसºया दिवशी त्या गावामध्ये उमेदवार स्वत: पोहोचत आहे. १२ दिवसांमध्ये संपूर्ण गावे पिंजून काढण्याचा प्रयत्न उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे पक्ष कार्यालयात सकाळी १० वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक येणार आहेत. त्यांच्या सभांना गर्दी कशी जमवायची, संबंधित स्टार प्रचारकाची व्यवस्था याविषयी नियोजन केले जाते.
नियोजनासाठी स्वतंत्र समिती
प्रचाराचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विशिष्ट कामाची जबाबदारी संबंधित पदाधिाºयावर सोपविण्यात आली आहे. समितीमध्ये निवडणूक व्यवस्थापन प्रमुख, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख, जाहीर साभा/दौरा प्रमुख, निवास/वाहन प्रमुख, विधानसभा संयोजक, साहित्या वाटप प्रमुख, परवानगी प्रमुख, हिशोब प्रमुख, महिला प्रमुख, कार्यालय प्रमुख यांचा समावेश आहे.
केवळ चहा, नाश्ता नाही
ग्रामीण भागातून दिवसभर कार्यकर्ते पक्ष कार्यालयात येत राहतात. कार्यकर्त्यांसाठी चहाची सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या कार्यकर्त्याला भूक लागली असल्यास त्याला स्वत:च्या पैशाने बाहेर जाऊन नाश्ता केल्याशिवाय पर्याय नाही. काही मोजके कार्यकर्ते निवासी आहेत. त्यांच्याच जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्ष कार्यालयात स्टेज बनविण्यात आले आहे. थोडी उसंत मिळाल्यानंतर कार्यकर्ते याच स्टेजवर थोडी डुलकी मारून रिफ्रेश होतात.