Maharashtra Election 2019: नक्षल्यांचा फतवा झुगारून उत्स्फूर्त मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:07 AM2019-10-22T04:07:50+5:302019-10-22T06:11:36+5:30
Maharashtra Election 2019: नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी काढलेल्या फतव्याला न जुमानता दुर्गम भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटर पायी चालत येऊन तसेच काहींनी बोटने मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी काढलेल्या फतव्याला न जुमानता दुर्गम भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटर पायी चालत येऊन तसेच काहींनी बोटने मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान एटापल्ली तालुक्यात गट्टा ते कोटी मार्गावर स्फोटासारख्या आवाज झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. परंतु तो भूसुरूंग स्फोट किंवा फायरिंग नसून फटाक्यांचा आवाज असण्याची शक्यता अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केली. गडचिरोली उपविभागांतर्गत मौजा वेंगणूर (ता. मुलचेरा) येथील मतदान केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव मौजा रेगडी येथे हलविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना १३ किमी अंतर पार करून पायी तसेच नाल्यातून डोंग्याने प्रवास करून रेगडीत मतदानासाठी पोहोचावे लागले. याशिवाय एटापल्ली तालुक्यात सुरक्षेच्या कारणावरून अनेक मतदान केंद्रे बदलण्यात आली.
पुरसलगोंदी येथील मतदान केंद्र गावापासून काही अंतरावर कच्च्या घरात ठेवले होते. एटापल्ली तालुक्यात अनेक गावकऱ्यांना कमरेपेक्षा जास्त पाण्यातून वाट काढत मतदान केंद्रावर जावे लागले. जिल्ह्यात तीनही मतदार संघात मिळून ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे.
दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मतदान केंद्रावर ड्युटी असताना दोन कर्मचाºयांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यात जि.प.शाळेवर शिक्षक तर दुसरे चामोर्शी नगर पंचायतमध्ये शिपाई होते. शिक्षकावर फिट येऊन पडल्याने तर शिपायावर छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू होते. नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील रेखणार येथील मतदान केंद्र गावाजवळच्या जंगलात उघड्यावरच थाटण्यात आले होते. तेथेही परिसरातील आदिवासी बांधवांनी येऊन उत्साहात मतदान केले.