रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अतिशय विपरित परिस्थिती असताना आणि सोयी-सुविधांपासून कोसो दूर असताना अशिक्षित आदिवासी नागरिकांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह शहरी नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. किमान आतातरी निवडून येणारे लोकप्रतिनिधी किमान पुढील निवडणुकीपर्यंत या मतदारांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करून देतील का? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.वास्तविक एटापल्लीसारख्या दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी असलेल्या गावांमध्ये आजही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात जाण्यासाठी चांगला रस्तासुद्धा नाही. पावसाळ्याच्या ५ महिन्यात तर अक्षरश: गाव ओलांडण्यासाठी पाण्यातून जावे लागते. जिथे जगण्यासाठीच संघर्ष सुरू असतो तिथे मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याशी काय घेणे-देणे? असा विचार या भागातील कोणीही नागरिक करू शकतो. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आपला लोकप्रतिनिधी आपण निवडला पाहीजे या भावनेतून नागरिकांनी जंगल तुडवत आणि छातीभर पाण्यातून वाट काढत मतदान केंद्र गाठले. विकासाच्या नावावर आतापर्यंत जरी काही मिळाले नसेल तरी किमान पुढच्या काळात तरी मिळेल या भाबड्या आशेने आदिवासी लोक मतदानासाठी सरसावले. विशेष म्हणजे नक्षल दहशतीला न जुमानता नागरिक मतदान केंद्रावर पोहोचल्याने त्यांना नक्षलवाद नको, विकास हवा हा संदेशही त्यांनी दिला.
Maharashtra Election 2019 ; अशिक्षित आदिवासींनी दाखविला पुन्हा एकदा लोकशाहीवर विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:19 AM