लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर विधानसभेच्या सात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यापैकी १९९५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तिनही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. १९९५ मध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात ८८.३६, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ८६.४४ तर सिरोंचा विधानसभा क्षेत्रात ८७.१९ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावर्षी १९९५ च्या मतदानाची टक्केवारी पार करून नवीन रेकॉर्ड होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तसेच नक्षलवादी चळवळीची दहशतही कायम आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने निवडणूक प्रक्रियेत वेळोवेळी बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो. वेळप्रसंगी निवडणुकीत मतदान करू नये, यासाठी स्थानिक नागरिकांवर दबावही टाकल्या जातो. एवढी विपरित परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी बहुतांशवेळा ६० टक्क्यांहून अधिक राहते.महाराष्टÑ राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ ते २०१४ या कालावधीत विधानसभेच्या १२ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. १९९५ मध्ये आठवी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मतदानाची नोंद १९९५ मध्ये करण्यात आली. त्याहीवेळी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ कायम होती. आजच्या तुलनेत सुरक्षा यंत्रणा तोकडी होती. साधनांचा अभाव व साक्षरता सुद्धा कमी होती. तरीही मतदानाच्या टक्केवारीचा नवीन रेकार्ड झाला.यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मतदानादरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणतीही आडकाठी आणली जाऊ नये, यासाठी सुमारे २० हजार सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहेत. शाळांतर्फे रॅली काढून जनजागृती करण्यात आली.एकंदरीतच मतदानासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यावर्षी मतदानाची टक्केवारी १९९५ चा रेकॉर्ड तोडणार काय, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.शहरातील नागरिकांसाठी धडाशहरातील जनता लोकशाही तसेच स्वत:च्या अधिकाराविषयी जागरूक मानली जाते. निवडणुका व मतदान हे लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅप, पानठेल्यावर लोकशाहीच्या संरक्षणाबाबत गप्पा मारणारे शहरी नागरिक मतदान करीत नाहीत. त्यामुळे शहरांमधील आकडेवारी ५० टक्केहून कमीच राहात असल्याचा अनुभव आहे. दुसरीकडे दुर्गम तसेच ग्रामीण भागातील नागरिक मतदान करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहतात. शहरी नागरिकांसाठी हा फार मोठा धडा आहे. लोकशाहीबाबत खरे जागरूक नागरिक कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्या विरळ आहे. चार ते पाच गावे मिळून मतदान केंद्र आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही मतदान केंद्रे वेळेवर बदलविले जातात. अशावेळी मतदारांना सात ते आठ किमीचे अंतर पायी कापून मतदान करावे लागते. तरीही मतदारांची मतदान करण्यासाठी गर्दी उसळत असल्याचे दिसून येते.
Maharashtra Election 2019 ; १९९५ ची टक्केवारी पार होणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तसेच नक्षलवादी चळवळीची दहशतही कायम आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने निवडणूक प्रक्रियेत वेळोवेळी बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो. वेळप्रसंगी निवडणुकीत मतदान करू नये, यासाठी स्थानिक नागरिकांवर दबावही टाकल्या जातो.
ठळक मुद्देप्रशासनाची जोरदार तयारी : मतदानासाठी सकारात्मक वातावरण