Maharashtra Election 2019 ; दोन पैशासाठी अमूल्य मत विकू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:35+5:30
गावातील दारूविक्री पूर्णत: बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची शक्यता असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील अनेक गावांनी दारुमुक्त निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे. आपले अमूल्य मत दोन पैशाच्या दारूसाठी विकणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान गावात दारूचा वापर होऊ देणार नाही, असा निर्धार आतापर्यंत २८ गावांनी गावसभेच्या ठरवा व रॅलीतून व्यक्त केला आहे.
गावातील दारूविक्री पूर्णत: बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची शक्यता असते. मतदारांचे अमूल्य मत मिळविण्यासाठी त्यांना दारूचे आमिष दाखविण्याचा प्रकारही घडतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून तालुक्यातील अनेक मुक्तिपथ गावसंघटना पुढे सरसावल्या आहे. दारु पिणारा, दारूचे समर्थन करणारा व दारूबंदीला विरोध करणारा उमेदवार चालणार नाही, असे ठराव आतापर्यंत तालुक्यातील २८ गावांनी घेतले आहेत. तुकूम, नवरगाव, मिचगाव बु. पेंढरी, गिरोला, पयडी, पुस्टोला, पन्नेमारा, दुधमाला, महावाडा, साखेरा, झाडापापडा, पेकीनमुडझा, गट्टेपायली, खुटगाव, कटेझरी, कारवाफा, गोडलवाही, रांगी, मुरूमगाव, चव्हेला, मुज्यालगोंदी, गुजनवाडी, तळेगाव, सायगाव, उदेगाव यासह इतरही गावांनी दारूमुक्त निवडणूक करण्याचा निर्धार केला आहे. गावागावांमध्ये दारुमुक्त निवडणूक करण्यासाठी रॅली काढून जनजागृती करीत आहे.
प्रचारादरम्यान दारूच्या वापरावर नियंत्रण आवश्यक
निवडणूक आचार संहितेतही प्रचारादरम्यान दारूच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान कुणी मतदारांना दारूचे आमिष देत असल्यास तो गुन्हा आहे. त्यामुळे असा प्रकार होत असल्यास पोलिसांनी त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. गावात मिरवणुकीदरम्यान लपून छपून येणाऱ्या दारूवर बारीक नजर गावसंघटनेच्या महिला ठेवून आहेत.