अनेक कुटुंब रंगले दारूच्या धंद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2015 01:27 AM2015-08-05T01:27:12+5:302015-08-05T01:27:12+5:30
१९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता संपूर्ण कुटुंब अनेक ठिकाणी दारूच्या अवैध व्यवसायात गुंतले असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
पोलिसांच्या धाडसत्रात झाले उघड : दारूबंदी जिल्ह्यातील विदारक वास्तव
गडचिरोली : १९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता संपूर्ण कुटुंब अनेक ठिकाणी दारूच्या अवैध व्यवसायात गुंतले असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये पती, पत्नी, मुलगा हे सारे दारूच्या व्यवसायात गुंतले. धाडीदरम्यान काही अख्या कुटुंबावरच पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले असल्याचाही प्रकार उघडकीस आला.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र या दारूबंदीची कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे गावागावात दारूचा व्यवसाय फोफावत राहिला व या अवैध व्यवसायात आज १० हजारावर अधिक लोक गुंतलेले आहे. युवकांपासून वयोवृध्द व महिला या सर्व घटकांचा या अवैध धंद्यांत सहभाग आहे. अत्यंत कमी मेहनतीत बनावट कंपन्यांची दारू या लोकांमार्फत जिल्ह्यातील तसेच परप्रांतातील दारू तस्कर पोहोचवित आहे. या अवैध दारू व्यवसायात जिल्ह्यातील अनेक खेड्यात अख्ख कुटुंबच काम करीत असल्याची माहिती पोलिसांच्या धाडसत्रातून पुढे आली आहे. १ एप्रिलपासून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विशेष पथकामार्फत अंमलबजावणी यंत्रणा सक्रीय केली. त्यांनी धाड घालून कारवाई प्रारंभही केली. अनेक ठिकाणी वडील, मुलगा, आई यांच्यावर दारूच्या अवैध विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली. या कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर दारू विक्री करण्यात येत असल्याचे पोलिसांनाही आढळून आले. पती, पत्नी दोघेही दारू व्यवयात सक्रीयरित्या काम करून या अवैध धंद्यातून अनेक व्यवसायिकांनी चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी केले. मोठे घरही बांधले, अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे. जिल्ह्यातील मोठ्या गावांच्या पॉश वस्त्यांमध्येही दारूचा अवैध व्यवसाय महिलांच्या मार्फत त्यांचे कुटुंबीय चालवितात. ही माहितीही पुढे आली आहे. वैरागड गावात अलिकडेच मुलगा, वडील व पत्नी या तिघांवरही पोलिसांनी कारवाई केली. पती, पत्नीवर आतापर्यंत बऱ्याच प्रकरणात कारवाई झालेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अवैध दारू विक्रीची १६० प्रकरणे दाखल
३ आॅगस्ट २०१५ पर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे १६० प्रकरणे दाखल केले आहेत. यात ३५८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २७१ पुरूष, ८७ महिला यांचा समावेश आहे. यांच्याकडून ९३ लाख ९७ हजार ५६० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. नऊ चारचाकी वाहने तर १९ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. यातील बहुतांशी वाहने ही दारू विक्रेत्यांनी स्वत: खरेदी केलेली आहेत. या गुन्ह्यांमध्ये पती, पत्नी आरोपी असलेले जवळजवळ ६० टक्के गुन्हे आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात काम करते. हे ही पोलिसांना दिसून आले आहे. ही सामाजिक दृष्टिकोनातून योग्य बाब नसल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.