हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 01:33 AM2016-03-18T01:33:22+5:302016-03-18T01:33:22+5:30

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील इंदिरा गांधी मेमोरिअल हायस्कूल परीक्षा केंद्रावरील दहावीच्या हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर देण्यात आला.

Marathi medium papers for Hindi medium students | हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर

हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर

Next

सुभाषग्राम येथील प्रकार : पेपरला दोन तास उशीर
घोट : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील इंदिरा गांधी मेमोरिअल हायस्कूल परीक्षा केंद्रावरील दहावीच्या हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. मात्र झालेली चूक लक्षात येताच पेपरच्या झेरॉक्स काढून हिंदी माध्यमाचा पेपर देण्यात आला. यामुळे पेपर सुरू होण्यास अडीच तास उशीर झाला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा घेतली जात आहे. १७ मार्च रोजी दहावीचा इतिहास-नागरीशास्त्र विषयाचा पेपर होता. सुभाषग्राम येथील हिंदी मेमोरीअल हायस्कूल परीक्षा केंद्रावर एकूण ६०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये हिंदी माध्यमाचे जवळपास ३०० व मराठी माध्यमांचे ३०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र अनावधानाने या परीक्षा केंद्रावर सर्वच पेपर मराठी माध्यमाचे पाठविण्यात आले. हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही मराठी माध्यमाचेच पेपर मिळाले. मराठी माध्यमाचा पेपर मिळताच विद्यार्थी गोंधळले. ही बाब परीक्षा केंद्र प्रमुखांच्या लक्षात आणून देण्यात आली. यानंतर जवळच्या घोट परीक्षा केंद्रावरून हिंदी माध्यमाचा पेपर आणून त्याच्या झेरॉक्स काढण्यात आल्या व विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आला. यामध्ये जवळपास दोन तास पेपर उशीरा सुरू झाला. शिक्षण विभागाच्या या गलथान कारभाराबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)

शिक्षणाधिकारी पोहोचले परीक्षा केंद्रावर
पेपरमध्ये गडबळ झाली असल्याची बाब माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांना माहित झाल्यानंतर त्यांनी स्वत: सुभाषग्राम गाठले. घोट येथून पेपर बोलवून स्वत:च्या नियंत्रणात झेरॉक्स काढून घेतल्या. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे व त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्यामुळे उशीरा का होईना विद्यार्थ्यांना पेपर त्याच दिवशी सोडविता येणे शक्य झाले.

Web Title: Marathi medium papers for Hindi medium students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.