गडचिरोलीत नावेतून नदी पार करून गरोदर मातेची प्रसुती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 10:32 PM2020-10-08T22:32:28+5:302020-10-08T22:33:12+5:30
भामरागड येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोलागुडा येथील गरोदर महिलेला पामुलगौतम नदीतून नावेने आणण्यात आले. या मातेने भामरागडातील रूग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
गडचिरोली - भामरागड येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोलागुडा येथील गरोदर महिलेला पामुलगौतम नदीतून नावेने आणण्यात आले. या मातेने भामरागडातील रूग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने गोलागुडावासीयांना हा वनवास सहन करावा लागत आहे.
गोलागुडा येथील रमिला पल्लो (२१) हिला प्रसुतीसाठी भामरागड रूग्णालयात भरती करायचे आहे, अशी माहिती गावातील आशा वर्कर जिमो पोयामी यांनी आरोग्य यंत्रणेला दिली. तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश पिरणकर यांच्या निर्देशानुसार भामरागड येथील पर्यवेक्षिका भूमिका कांबळे, आरोग्य सहायिका सपना भुरसे यांनी नावेने गोलागुडा गाव गाठले. रमिला हिला पामुलगौतम नदीपर्यंत खाटेने आणण्यात आले. त्यानंतर खाट नावेवर मांडून नदी पार केली. पुढे रूग्णवाहिकेने मातेला रूग्णालयात हलविण्यात आले. मातेची प्रसुती झाली असून तिने गोंडस बाळाला जन्म दिला. नदीवर पूल नसल्याने अशी कसरत करावी लागत आहे.