गडचिरोलीमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:15 PM2021-05-20T22:15:10+5:302021-05-20T22:15:40+5:30
डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने गुरुवारी अचानक आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घोट (गडचिरोली) : डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने गुरुवारी अचानक आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्नेहा भिवाजी हिचामी (वय २१, रा. घोट) असे मृत युवतीचे नाव आहे. दुपारी १.३० ते २ च्या दरम्यान स्नेहाने आपल्या घराला लागून असलेला रिकाम्या खोलीत पंखा लटकवायच्या हुकला नायलॉनची दोरी बांधून त्याला गळफास घेतला. ८ दिवसाआधीच या घरातून किरायेदार गेल्याने ते रिकामे होते.
स्नेहा ही चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील पोलीस विभागात कर्मचारी असून घरात आई व एक भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे. एका होतकरू मुलीच्या जीवनाचा असा शेवट होण्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.
स्नेहाला कशाचे ‘डिप्रेशन’?
आत्महत्येपूर्वी स्नेहाने खोलीतील भिंतीवर ‘डिप्रेशन’ असे इंग्रजीत लिहून ठेवले होते. यावरून तिला नैराश्य आले होते, पण हे नैराश्य नेमके कशामुळे हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोरोनाची स्थिती, सततचे लॉकडाऊन, त्यामुळे अभ्यासक्रमाचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने तिला हे नैराश्य आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.