लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नशिब बलवत्तर आणि त्याला योग्य प्रयत्नांची जोड मिळाली तर माणूस कुठल्या कुठे पोहोचू शकतो. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खासदार अशोक नेते आहे. अवघ्या ३० वर्षात खानावळ चालक ते खासदार आणि भाजपच्या आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेल्या अशोक नेते यांचे हे यश एक संघर्षपूर्ण कहाणी आहे.आपले ज्येष्ठ बंधू तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नामदेवराव नेते यांच्यासोबत ते १९८९ मध्ये गडचिरोलीत आले. गांधी चौकात त्यांनी खानावळ (भोजनालय) सुरू केली. या दरम्यान मोटर ड्रायव्हिंग स्कूलही सुरू केली. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांचा संबंध भाजपशी आला आणि पाहता पाहता भाजयुमोचे तालुका अध्यक्ष ते पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदापर्यंतची मजल त्यांनी गाठली.यादरम्यान दोन वेळा विधानसभेत तर आता दुसऱ्यांना लोकसभेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना जनताजनार्दनाने दिली आहे. त्यांची ही राजकीय कारकिर्द अशीच चढत राहिल्यास मंत्रीपदाची खुर्चीही त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१९६४ जन्म१९९५ भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष१९९९ १९९७ मध्ये भाजप आदिवासी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. दरम्यान १९९९ मध्ये भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळाले. ही निवडणूक त्यांनी जिंकली आणि २००४ पर्यंत ते आमदार राहिले.२००४ १९९८ ते २००१ भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव व नंतर २००४ पर्यंत प्रदेश अध्यक्षपद सांभाळल्यानंतर २००४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागली.२०१४ २००१४ मध्ये पुन्हा एकदा पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. त्यात त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत पहिल्यांदा संसद भवन गाठले. यादरम्यान २०१५ मध्ये ते केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचे सदस्य होते. २०१७ मध्ये त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. काही दिवसातच त्यांना आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले.चढत्या राजकीय आलेखात २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकून त्यांनी सलग दुसऱ्यांदा भाजपला खासदारकी मिळवून दिली. कार्यकर्त्यांपासून तर जनतेपर्यंत सर्वांना योग्य पद्धतीने हाताळण्याची सचोटी यामुळेच त्यांचा राजकीय आलेख सतत वर चढत आहे. कितीही संकटे आली तरी आपले संतुलन न बिघडवू देता त्यावर संयमाने मात करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या रुपाने जिल्ह्याला लाल दिवा मिळाल्यास विकासाला गती मिळेल.