कृषी तंत्रज्ञानावर लाखोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:23 PM2019-05-15T23:23:30+5:302019-05-15T23:24:12+5:30
कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात येते. याशिवाय मुद्रीत साहित्य तसेच ध्वनीचित्रफितीचा सुध्दा वापर करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते.
सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन, रेशीम संगोपन, दुग्ध व्यवसाय विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी यंत्रणांनी सदर उपक्रमात सहभाग घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
हे उपक्रम राबविण्यासाठी यंत्रणानिहाय शासकीय निधी अनुदानाच्या स्वरूपात वितरित करण्यात आला. यामध्ये कृषी विभागाला १ कोटी २४ लाख ३८ हजार, कृषी विज्ञान केंद्राला ६ लाख ४० हजार, मत्स्य व्यवसाय विभागाला ७ लाख ३९ हजार, पशुसंवर्धन विभागाला ४ लाख ४० हजार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाला १३ लाख ८ हजार, रेशीम संगोपन विभागाला ८ लाख १८ हजार व महिला आर्थिक विकास महामंडळाला २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या सर्व यंत्रणा मिळून एकूण १ कोटी ६२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
धान उत्पादक शेतकºयांना प्रशिक्षण
आत्मा गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय शेतीच्या स्वरूपात ३१ गट तयार करण्यात आले असून २ हजार २०० एकर क्षेत्रावर १ हजार ५५० शेतकऱ्यांद्वारे भारत सरकारच्या पीजीएस इंडिया प्रमाणे अंतर्गत सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन केले जात आहे. या शेतमालाच्या विपणनासाठी गोफ्स नावाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतमालाचे मार्केटींग करण्यात येत आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, प्रशिक्षणाचा कार्यक्रम सिक्कीम येथे करण्यात आले होते. संपूर्ण सेंद्रीय शेती राज्य या संकल्पनेवर गटात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
फेसबूक व युट्युब चॅनलद्वारेही जनजागृती
कृषी विभागाच्या विविध योजना, आत्मा कार्यालयाद्वारे शेतकºयांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व इतर बाबींची माहिती कार्यालयीन फेसबूक व युट्युब चॅनलद्वारे नियमित प्रसारीत केली जात आहे. या माध्यमातून धान व इतर पिकांच्या लागवडीबाबत शेतकºयांना योग्य सल्ला दिला जात आहे.