भेंडाळा : चामोर्शी तालुक्याच्या हरणघाट भागात अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. सातत्याने मागणी करूनही या भागात दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत.
वैनगंगा नदीपासून जिल्ह्याची सीमा लागते. समोर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला प्रारंभ होतो. गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करताना हरणघाट मार्गावर दोन्ही बाजूच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक जीर्ण झाल्यामुळे आजपर्यंत तो कुणाला दिसलाच नाही. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गाने येणारे प्रवासी गोंधळून जातात. याच परिसरात चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाका आहे. या नाक्याच्या बाजूला घारगाव मार्गे मार्कंडाकडे जाणारा रस्ता आहे. अनेक जण या नव्या मार्गानेच प्रवास करतात. मात्र, या रस्त्याची परिसरातील बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.