पेंटिपाकाचे पर्जन्यमापक केंद्र दारू बाटल्यांचे संग्रहालय!
By admin | Published: July 19, 2015 01:42 AM2015-07-19T01:42:59+5:302015-07-19T01:42:59+5:30
तालुक्यातील तुन्नूर शिवारात असलेल्या पेंटीपाकाच्या पर्जमापक केंद्रात दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : रिकाम्या दारू बाटल्यांचा खच
सिरोंचा : तालुक्यातील तुन्नूर शिवारात असलेल्या पेंटीपाकाच्या पर्जमापक केंद्रात दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. परिणामी सदर पर्जमापक केंद्र विविध ब्रँडच्या रिकाम्या दारू बाटल्यांचे संग्रहालय बनले असल्याचे दिसून येत आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ च्या कडेला पेंटिपाकाचे पर्जन्यमापक केंद्र आहे. वनव्याप्त जागेत काटेरी, लोखंडी तारांचे कुंपन करून सदर भाग नाममात्र सुरक्षित असला तरी मद्यपी लोक या ठिकाणी मद्यप्राशनाच्या पार्ट्या करीत असल्याचे दिसून येते. पार्टीदरम्यान दारू प्राशन केल्यानंतर मद्यपी सदर जागेत दारूच्या रिकाम्या बाटला फेकून देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच निर्माण झाला आहे. मद्यपी या ठिकाणी येऊन आपली दारूची हौस भागवित आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पर्जन्यमापक केंद्र कुचकामी
सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पर्जन्यमापक केंद्र आहे. कुंपणाआड मोकळ्या गवताळ जागेच्या मधोमध हिरव्या रंगाचे पर्जन्यमापक यंत्र आहे. या यंत्राला लावलेले कुलूप पूर्णत: गंजलेले असून ते चावीने उघडणे शक्य नाही. यंत्राच्या पोकळीत जंगलातला पालापाचोडा व काठ्या पडून आहेत. यात पावसाचे पाणी साचने अशक्य आहे. त्यामुळे येथे पर्जन्याचे मोजमाप होत नसल्याने सदर केंद्र कुचकामी ठरले आहे.