दीड महिन्यातील कारवायांनी भरून काढली तीन महिन्यांची कसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:39 AM2021-05-20T04:39:47+5:302021-05-20T04:39:47+5:30
देसाईगंज : जिल्ह्यात दारूची आयात होण्याचे एक केंद्र समजल्या जाणाऱ्या देसाईगंजमध्ये दारू तस्करीला आळा घालण्यात पोलिसांना बऱ्याच प्रमाणात यश ...
देसाईगंज : जिल्ह्यात दारूची आयात होण्याचे एक केंद्र समजल्या जाणाऱ्या देसाईगंजमध्ये दारू तस्करीला आळा घालण्यात पोलिसांना बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी रुजू झालेल्या नवीन पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवायांचा धडाका लावत तब्बल २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय इतरही गुन्ह्यांवर वचक बसविला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून एप्रिलच्या सुरुवातीला देसाईगंज ठाण्याचा प्रभार डॉ. विशाल जयस्वाल यांनी स्वीकारला. त्यामुळे १ एप्रिल ते १६ मे या दीड महिन्यातील कारवायांचे प्रमाण जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यातील कारवायांपेक्षाही जास्त आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात दारुबंदी अधिनियमांतर्गत १०६ गुन्हे दाखल होऊन ११२ आरोपींना अटक झाली होती. यात ११ लाख ३४ हजार ८४० रुपयांचा माल जप्त झाला होता. तसेच जुगाराचे १३ गुन्हे दाखल होऊन २० आरोपींवर कारवाई करून १८ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एप्रिल ते १६ मे या दीड महिन्यात दारुबंदीचे ७८ गुन्हे दाखल होऊन १०२ आरोपींना अटक झाली. याशिवाय २३ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगाराच्या ९ कारवाया करून ९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २९ हजार ६१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय अवैधपणे सुगंधित तंबाखू विक्रीचे २ गुन्हे दाखल करून १ लाख ८७ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
(बॉक्स)
गंभीर गुन्हे झाले कमी
भाग १ ते ५ मध्ये मोडणाऱ्या खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, बलात्कार अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही गेल्या दीड महिन्यात कमी झाले आले. जानेवारी ते मार्च दरम्यान या प्रकारातील ३८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. पण १ एप्रिल ते १६ मे यादरम्यान केवळ ८ गुन्हे दाखल झाले. त्यामुळे समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यातही देसाईगंज पोलिसांचे यश वाढल्याचे दिसून येते.