घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:54+5:302021-05-24T04:35:54+5:30

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या ...

Mosquitoes grew in the gutters of dirty water | घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले

घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले

Next

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतूनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार?

गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.

मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे.

शहरातील पक्के अतिक्रमण कायमच

आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गांवर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे.

मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा कायम

धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात कि.मी.चे अंतर असून या मार्गावर गिट्टी पूर्णत: उखडली आहे. हा मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर दोन नाले असून, त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चार महिने या मार्गावरील वाहतूक बंद असते. अशावेळी गावात एखादी आकस्मिक घटना घडल्यास बोधनखेडावासीयांना काहीच पर्याय नसतो. गंभीर रुग्णांना औषधोपचारासाठी पावसाळ्यात मार्ग नसल्याने तालुका व जिल्हा स्थळावर नेता येत नाही.

लाहेरी परिसरात वीज चोरी वाढली

लाहेरी: अनेक वर्षांपासून काही नागरिक घरी विद्युत मीटर न लावता वीज चोरी सर्रास करीत आहेत; परंतु या प्रकाराकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावातील मुख्य चौकात काही व्यापारी दिवसाढवळ्या विजेची चोरी करतात; परंतु विद्युत कर्मचारी या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत. मात्र, याचा आर्थिक फटका गावातील अन्य ग्राहकांना सोसावा लागत आहे. सर्रास वीज चोरी केली असताना या व्यावसायिकांवर महावितरण कंपनीतर्फे का कारवाई केली जात नाही, असा सवाल गावातील नागरिकांनी केला आहे.

वाघोली परिसरात इंटरनेटची समस्या

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून बीएसएनएल कंपनी व इतर खासगी कंपन्यांचे नेटवर्क वारंवार विस्कळीत होत आहे, तसेच इंटरनेटची अत्यंत कमी स्पीड असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. भेंडाळा परिसरात १५ गावांचा समावेश आहे. येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ग्राहकांकडे बीएसएनएलची सेवा उपलब्ध आहे; परंतु ही सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. इतर खासगी कंपन्या फोर-जी सेवा देत असतानाही बीएसएनएल थ्री-जी सेवा देत आहे. त्यातही इंटरनेट स्पीड अत्यंत संथ आहे. अनेकदा कव्हरेज, तसेच इंटरनेट विस्कळीत होतो. सातत्याने मागणी करूनही बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नाही.

वीज तारांपासून नागरिकांना धोका

आरमोरी : येथील पालोरामार्गे जाणाऱ्या टॉवर परिसरातील रस्त्याच्या कडेला विद्युत तारा लोंबकळत आहेत. आरमोरी शहरात बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे. काही ठिकाणी विद्युत खांब कमी उंचीचे असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने तारा ताणाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, तसेच दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेणे महावितरण कंपनीचे काम आहे; परंतु याकडे महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. या लोंबकळणाऱ्या तारांपासून दुर्घटना घडू शकते. रस्त्याने आवागमन करताना विजेचा झटका बसताे.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबीयांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

दुर्गम भागात कर्मचारी राहतच नाहीत

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागातील कर्मचारी दररोज अप-डाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

चपराळा येथे सोयीसुविधा पुरवा

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.

Web Title: Mosquitoes grew in the gutters of dirty water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.