चवथ्या दिवशीही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:34 AM2019-06-14T00:34:26+5:302019-06-14T00:34:56+5:30
अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी सोमवारपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन चवथ्या दिवशी गुरूवारला सुरूच होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन चवथ्या दिवशी गुरूवारला सुरूच होते. सदर आंदोलनाची शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी केला आहे.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू करावी. सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे. नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चवथ्या दिवशी विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गुरूवारला मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रचंड नारेबाजी करून निदर्शने केली. सातवा वेतन आयोग लागू करा, एकस्तर पदोन्नतीचा लाभ लागू करा, ३० टक्के जागा कपातीचा निर्णय रद्द करा, अनुकंपा भरतीचे आदेश तत्काळ द्या, वैद्यकीय बिलाचे प्रस्ताव मंजूर करा अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनात विद्यापीठ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जुनघरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव वासेकर, सचिव सतीश पडोळे यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले. हे आंदोलन तिसऱ्या टप्प्यात सुरू असून या आंदोलनाला विविध कर्मचारी संघटनेकडून पाठिंबा मिळत आहे. सदर आंदोलनामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. शासनाने मागण्यांवर लवकर निर्णय घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
जुलै महिन्यात बेमुदत संप
विद्यापीठ कर्मचाºयांच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनात ८० कर्मचारी सहभागी झाले आहेत. सदर आंदोलनाचे अनेक टप्पे आहेत. १८ जून रोजी विभागीय सहसंचालक तर २५ जूनला शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जूनला एक दिवसाचा लाक्षणीक संप व त्यानंतर जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
बुधवारी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. शासनाकडे निवेदन पाठविण्यात आल्याचे डॉ.मोहुर्ले यांनी त्यांना सांगितले.