देसाईगंज : कोरोना महामारीच्या संकटातून गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक अद्यापही सावरले नाहीत. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने घरगुती वीजबिल वसुली सुरू केली आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिक चांगलेच धास्तावले असून, ते अडचणीत सापडले आहेत. वीज बिल माफीच्या मागणीसाठी भाजपने केलेल्या ‘कुलूप ठाेकाे’ आंदाेलनाचा काहीच प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आल्यापासून मध्यमवर्गीय, व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांना उद्योगधंदे बंद पडून हातचा रोजगार हिरावला गेल्याने चांगलाच फटका बसला आहे. अशातच झालेला अवकाळी पाऊस व ऐन भरात धानपीक असताना धानपिकावर झालेला मावा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव यामुळे रोजंदारीसह बाजारपेठेवर अनुकूल परिणाम झाल्याचे वास्तव आहे. दरम्यानच्या काळात घरगुती वीज ग्राहकांना भरमसाठ वीजबिल पाठवण्यात आले. दरम्यान, अनेक पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली असता, आघाडी शासनातील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लाॅकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिल्याने अनेक सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांनी वीजबिल भरलेच नसल्याने मोठ्या प्रमाणात थकीत झाले असून, सद्य स्थितीत हप्त्याची रक्कम पाडून देऊनही बहुसंख्य नागरिकांची वीजबिल भरण्याची परिस्थितीच नसल्याने वीजबिल भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थकीत वीजबिल भरण्यासाठी तगादा लावून वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना संबंधित वीज ग्राहकांना दिल्या असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.