लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.लगाम येथील वॉर्ड क्र.३ मध्ये सन २००४ मध्ये रस्त्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला नाही, असा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. मुख्य मार्गावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असल्याने जि.प.शाळेत जाणाऱ्या सदर वॉर्डातील विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. हा मार्ग शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सोयीचा होता. मात्र १५ वर्षांपासून वॉर्ड क्र.३ हा विकास कामांच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. सदर रस्त्याचे खडीकरण तसेच नाली बांधकाम न केल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.यापूर्वीही १४ व्या वित्त आयोगातून रस्ते व नालीचे बांधकाम करण्यात येत होते. मात्र आता शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रस्ते व नालीचे बांधकाम करण्यास निर्बंध घातले आहे. त्यामुळे गावातील रस्ते व नालीचे बांधकाम कोणत्या निधीतून करायचे, असा प्रश्न ग्रामपंचायतसमोर निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ज्ञानेश्वर चिंतावार यांच्या घरापासून नामदेव सोनटक्के यांच्या घरापर्यंत तसेच संतोष चंदावार यांच्या घरापासून प्रमोद सिडाम यांच्या घरापर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिक सचिन मारटकर, विजय मडावी, प्रमोद सिडाम, गोविंदा आत्राम, सन्यासी सोयाम, किसन आत्राम, गोपाल मडावी, संतोष सोनटक्के, संतोष चंदावार, नंदा मारटकर, दिवाकर बैलवार, विजय सोनटक्के, कवडू सोनटक्के, रूपेश सोनटक्के, ज्ञानेश्वर चिंतावार, दिवाकर सोनटक्के, संदीप बिश्वास, विजय सोनटक्के आदींनी केली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे लगाम गावातील बहुतांश वॉर्डात नाली, रस्ता व इतर मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. पावसाळ्याच्या दिवसात गावामध्ये बहुतांश ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाली असून अस्वच्छता पसरली आहे. २लगाम येथील वॉर्ड क्र.३ मधील नामदेव सोनटक्के ते दिवाकर बैलवार यांच्या घरापर्यंत नाल्याची गरज लक्षात घेता जि.प.च्या २५/१५ या योजनेतून १०० मीटर नालीचे बांधकाम मी मंजूर करून घेतले आहे. लवकरच या नाली बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे.- माधुरी उरेते, समाजकल्याण सभापती, जि.प.गडचिरोलीलगाम येथील वॉर्ड क्र.३ मधील संबंधित रस्त्याचे काम राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करता आली असती. मात्र दुसरी बरीचशी कामे प्रस्तावित करूनही मस्टर निघत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत गावात कामे होत नसल्याची स्थिती आहे. पावसाळा संपताच सदर रस्त्यावर माती व मुरूम टाकण्यात येईल.- यशवंत गोंगले,सचिव ग्रामपंचायत, लगाम
लगाम गावात चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:37 PM
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्ता व नालीचा अभाव; नागरिक कमालीचे त्रस्त