नाल्यांची कामे निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:08 PM2019-05-15T23:08:05+5:302019-05-15T23:09:34+5:30
गडचिरोली शहरात सर्वत्र सुरू असलेल्या नाल्यांच्या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामांमधून काही पदाधिकारी आपला आर्थिक स्वार्थ साधत आहेत. शहरात भूमिगत गटार योजना मंजूर असताना या कामावर सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी काही दिवसातच वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरात सर्वत्र सुरू असलेल्या नाल्यांच्या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामांमधून काही पदाधिकारी आपला आर्थिक स्वार्थ साधत आहेत. शहरात भूमिगत गटार योजना मंजूर असताना या कामावर सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी काही दिवसातच वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या अनेक भागात नाल्यांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. पावसाळ्याआधी हे काम उरकण्याच्या प्रयत्नात एकाच वेळी अनेक ठिकाणच्या नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते अडून नागरिकांना रस्ता पार करणेही कठीण झाले आहे. नियोजनाच्या अभावामुळे आणि कोणत्याही पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या नादात या कामाचा दर्जा खालावला आहे. परंतू त्याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे.
वास्तविक नाल्यांचे काम करताना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असणाºया योग्य कंत्राटदाराकडून काम होणे अपेक्षित आहे. परंतू प्रत्यक्षात कंत्राट एकाच्या नावावर आणि काम करणारा दुसराच अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांचा योग्य उतार निघालेला नाही. अशा स्थितीत खोलगट भागात पाणी साचून पावसाळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर येणार आहे.
अनेक ठिकाणी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे. परंतू नगर परिषदेच्या यंत्रणेने डोळे मिटून घेतल्याने कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही. अनेक रस्ते अडलेले असताना कोणत्याच ठिकाणी बांधकामाची सूचना देणारा बोर्ड दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी नाल्यांसाठी सिमेंटचे पाईप टाकले तर काही ठिकाणी पाईप न टाकताच वरून नाल्या सिमेंट काँक्रीटने झाकल्या आहे. या मागे नेमके काय कारण आहे, हे समजू शकले नाही. एकूणच या कामाची चौकशी करून सरकारी पैशाचा अपव्यय थांबविण्याची मागणी जोर धरत आहे.
सरकारी पैशाचा अपव्यय
गडचिरोली शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर आहे. त्यासाठी निविदाही काढल्या होत्या. त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढे हे काम होणार आहेच. असे असताना सध्या सुरू असलेला नाल्यांच्या बांधकामावरील खर्च निरर्थक आणि पैशाचा अपव्यय करणारा आहे. कमिशनबाजीचा हा खेळ बंद करावा, अशी भावना माजी नगराध्यक्ष व जि.प. सदस्य अॅड.राम मेश्राम यांनी व्यक्त केली.