पावसाळ्यातही रेंगाळणार राष्ट्रीय महामार्गाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:03 PM2019-05-09T22:03:40+5:302019-05-09T22:04:20+5:30
गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात शहरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
छत्तीसगड सीमेवरील मुरूमगाव ते चंद्रपूर अशा २६२ किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० चे गडचिरोली शहरातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हाती घेण्यात आले. परंतु कंत्राटदाराच्या काम करण्याच्या धिम्या गतीमुळे हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणाºया अधिकाऱ्यांचेही त्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते.
शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाची रूंदी जास्त नसली तरी या मार्गावर दुभाजक राहणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे मार्ग लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या एका बाजुचा मार्ग खोदून त्यावर गिट्टी, मुरूम व चुरीचा थर टाकणे सुरू आहे. त्यावर सिमेंटीकरण झाल्यानंतरच दुसºया बाजुचा मार्ग खोदला जाईल. ऐन पावसाळ्यात एका बाजुचा रस्ता खोदलेला राहिल्यास त्यात पाणी साचेल. चिखलामुळे वाहने घसरून खोदलेल्या रस्त्याच्या पाण्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.हिवाळा आणि उन्हाळ्यासारख्या मोकळे हवामान असणाºया काळातच हे काम तातडीने मार्गी लागले नसताना पावसाच्या अडथळ्यात या कामाला पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
शेकडो झाडांची कटाई
शहराच्या चंद्रपूर मार्गावर कॉम्प्लेक्स एरियापर्यंत अनेक वर्ष जुनी मोठमोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा होती. ही झाडे महामार्गाच्या कामासाठी कापण्यात आली. या मार्गाला पुन्हा ते वैभव प्राप्त करून घेण्यासाठी नवीन रस्त्याच्या बाजुला पुन्हा सक्तीने झाडे लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.